हगणदारीमुक्ती व प्लास्टिकबंदीचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:12 AM2019-04-26T01:12:28+5:302019-04-26T01:15:31+5:30
हगणदारीमुक्त गाव स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावागावांत शौचालय बांधकाम करण्यात आली. या शौचालयाचा वापर करण्यासाठी जनजागृतीद्वारे महत्त्व सांगण्यात आले. या अभियानावर आजवर कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र उन्हाळ्याचे दिवसांत पाणी मिळणे कठीण झाले
बिलोली : हगणदारीमुक्त गाव स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावागावांत शौचालय बांधकाम करण्यात आली. या शौचालयाचा वापर करण्यासाठी जनजागृतीद्वारे महत्त्व सांगण्यात आले. या अभियानावर आजवर कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र उन्हाळ्याचे दिवसांत पाणी मिळणे कठीण झाले असताना शौचालयात टाकायला पाणी कोठून आणावे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत नाईलाजास्तव जुनीच परंपरा सुरु करीत उघड्यावर प्रातर्विधी उरकवित असल्याने हगणदारीमुक्त गाव स्वच्छता अभियानास ग्रहण लागले आहे.
यंदा बिलोली तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. परिणामी जमिनीतील पाण्याची पातळी कमालीची खालावली. अशा भीषण परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय योजना एकप्रकारे पाण्याअभावी शोभेच्या वास्तू बनल्याचे दिसून येत आहे.
शौचालय बांधकामासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात बहुतांश अंशी शासनाला यश सुद्धा आले. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी नागरिकांना पाणी मिळणे दुरापस्त झाल्याने शौचालयात टाकायला कोठून पाणी आणावे, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहत आहे. एकूणच हगणदारीमुक्तीची चर्चा तालुक्यात सर्वत्र जोर पकडत आहे़
रोगराईचा झपाट्याने प्रसार
ग्रामीण भागात शौचालयाअभावी नैसर्गिक प्रात:विधी उघड्यावर उरकवली जात असल्याने रोगराईचा प्रसार झपाट्याने व्हायचा. शिवाय यात महिलांना मोठी कुचंबणा सहन करावी लागायची. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने अनुदानातून शौचालय बांधकाम व वापराकरीता प्रोत्साहन दिले. नैसर्गिक आपत्तीमुळे पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी नागरिकांना पाणी मिळणे दुरापस्त झाल्याने शौचालयात टाकायला कोठून पाणी आणावे, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहत आहे.
माहुरात प्लास्टिक पिशव्यांचा खच
श्रीक्षेत्र माहूर : प्लास्टिक बंदीचा गतवर्षी निर्णय घेतल्यानंतरही माहूर शहरासह ग्रामीण भागात सरास प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर सुरू आहे. ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्यामुळेच शहराच्या कानाकोपºयात प्लास्टिक पिशव्यांचा खच साचला आहे.
सद्यस्थितीत सगळीकडे लगीनघाई दिसून येत आहे. यामध्ये प्लास्टिक पत्रावळी, पाणी ग्लास, थर्माकॉल द्रोणचा वापर होत आहे़ मात्र या उष्ट्या प्लास्टिक पत्रावळी, पाणी ग्लास, थर्माकोल, द्रोण नागरिक गावाच्या बाहेर आणून फेकून देतात. यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्लास्टिक पत्रावळी, ग्लास, थर्माकॉल द्रोण, प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळून आल्यास संबंधित व्यावसायिकांना दंड लावण्यात येत नाही.