आजपासून नांदेडमध्ये प्लास्टिक बंदी; विशेष पथकाची राहणार नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 05:37 PM2018-01-01T17:37:32+5:302018-01-01T17:38:03+5:30
शहरात नववर्षाच्या प्रारंभापासून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालण्यात आली असून विशेष पथकाद्वारे अशा प्लास्टिक पिशव्यांचा शोध घेतला जाणार आहे.
नांदेड : शहरात नववर्षाच्या प्रारंभापासून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालण्यात आली असून विशेष पथकाद्वारे अशा प्लास्टिक पिशव्यांचा शोध घेतला जाणार आहे.
राज्य शासनाच्या धोरणानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर, विक्रीवर, उत्पन्नावर बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाची होणारी अपरिमित हानी टाळण्यासाठी राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. नववर्षाच्या प्रारंभापासून शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणार्या, विकणार्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ही कारवाई ५ हजार, १० हजार व १५ हजार रुपये दंड स्वरूपात राहणार आहे.तर दुसर्या टप्प्यात गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
शहरात संपूर्ण प्लास्टिक बंदीचा निर्णयही महापालिकेच्या १९ डिसेंबरच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही केली जाणार आहे. १ एप्रिल २०१८ पासून शहरातून सर्व प्रकारच्या प्लास्टिक कॅरिबॅगच्या उत्पादनावर, विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत महापालिका प्लास्टिक निर्मूलनाबाबत जनजागृती करणार आहे. आगामी काळात मनपा हद्दीतील कोणताही व्यापारी, नागरिक, संस्थांनी प्लास्टिक पिशव्या खरेदी-विक्री, वापर व उत्पादन करु नये, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.