सुखद ! मराठवाड्यातील शासकीय कर्मचारी, सेवानिवृत्तांची दिवाळी गोड, पगार व पेन्शन १ नोव्हेंबरलाच खात्यात जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 01:28 PM2021-11-02T13:28:57+5:302021-11-02T13:30:33+5:30
ऑक्टोबर २०२१ या महिन्याचे वेतन व सेवानिवृत्ती वेतन दीपावलीपूर्वी संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश शासनाने दिले होते.
- सुनील जोशी
नांदेड - मराठवाड्यातील शासकीय कर्मचारी तसेच सेवानिवृत्तांची दिवाळी गोड होण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्यात आली. कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनपोटी १ नोव्हेंबर रोजी ६७१ कोटी संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती लेखा व कोषागार विभागाचे प्रादेशिक सहसंचालक उत्तम सोनकांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मराठवाड्यातील आठ जिल्हा कोषागार कार्यालय व ६८ उपकोषागार कार्यालयातून शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, उत्सव अग्रीम, सेवानिवृत्ती वेतन दिले जाते. ऑक्टोबर २०२१ या महिन्याचे वेतन व सेवानिवृत्ती वेतन दीपावलीपूर्वी संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्याप्रमाणे जिल्हा कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालयाने नियोजन करून योग्य ती पावले उचलली. त्यामुळे १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मराठवाड्यातील ६ लाख ९० हजार शासकीय कर्मचाऱ्यांचे ५१० कोटी रुपये वेतन देण्यात आले. उर्वरित कर्मचाऱ्यांचे १०० टक्के वेतन ३ नोव्हेंबरपूर्वी जमा करण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सुमारे १ लाख ६० हजारच्या आसपास सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सेवानिवृत्तांच्या वेतन खात्यावर १६१ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. १०० टक्के निवृत्ती वेतन अदा करण्यात आली, अशी माहितीही सोनकांबळे यांनी दिली.
सर्वांनी योगदान दिले
मराठवाड्यातील शासकीय कर्मचारी तसेच सेवानिवृत्तांचे वेतन लवकर व्हावे, यासाठी आठही जिल्ह्यांतील कोषागार व उपकोषागार कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोठे याेगदान दिले. ते अभिनंदनास पात्र ठरतात - उत्तम सोनकांबळे, प्रादेशिक सहसंचालक, लेखा व कोषागारे, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद.
जिल्हा कर्मचारी संख्या वेतन/रक्कम कोटीत
औरंगाबाद १ लाख ५० हजार १२९
परभणी ८० हजार ४७
बीड ८१ हजार ६१
नांदेड १ लाख १० हजार ८७
उस्मानाबाद ७५ हजार ४०
जालना ७० हजार ४८
लातूर ६० हजार ४५
हिंगोली ६० हजार ५३
निवृत्ती वेतन
जिल्हा कर्मचारी संख्या वेतन/रक्कम कोटीत
औरंगाबाद २८ हजार ४०
परभणी १५ हजार १५
बीड २२ हजार २८
नांदेड २३ हजार २६
उस्मानाबाद १८ हजार १०
जालना १९ हजार १०
लातूर २१ हजार २८
हिंगोली १४ हजार ०४