पाणीप्रश्नाआडून मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव - अशोकराव चव्हाण
By श्रीनिवास भोसले | Published: November 24, 2023 01:53 PM2023-11-24T13:53:37+5:302023-11-24T13:53:58+5:30
उत्तर महाराष्ट्रातील धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. या पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नांदेड : मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये सुरु आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पत्र लिहिल्याची बातमी धक्कादायक आहे. हा मराठा आरक्षण आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. या पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा आणि जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा कुठेही काहीही संबंध नाही. परंतु गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने सदरहू पत्र कोणत्या कारणांमुळे लिहिले गेले, याचा राज्य सरकारने तातडीने खुलासा करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडीत ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या २० ऑक्टोबर २०२३ रोजीच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला मा. सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे मराठवाड्यातील तीव्र पाणी टंचाई व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता राज्य सरकारने राजकीय दबावाला बळी न पडता मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.