ट्रॅव्हल्स चालकाकडून परतीच्या प्रवासात लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:53 PM2018-11-11T23:53:16+5:302018-11-11T23:54:04+5:30
मुंबईसाठी तब्बल ३ हजार तर पुण्यासाठी २ हजारांचे भाडे प्रति व्यक्ती आकारले जात आहे.
नांदेड : दिवाळी साजरी केल्यानंतर परतीच्या प्रवासाला लागलेल्या प्रवाशांची ट्रॅव्हल्सकडून मोठी लूट चालू आहे. नांदेडहून निघणाºया पुणे, मुंबई, नागपूर आदी लांब अंतराच्या गाड्यामध्ये प्रवासाचे दर दुपटीने वाढविण्यात आले आहे. मुंबईसाठी तब्बल ३ हजार तर पुण्यासाठी २ हजारांचे भाडे प्रति व्यक्ती आकारले जात आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जादा भाडे घेतल्यास तक्रार करावी, असे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. मात्र त्यानंतरही ही लूट खुलेआम सुरू आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर आदी शहराकडे जाणाºया बस, रेल्वे सध्या फुल झाल्या आहेत. त्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्सकडे वळले आहेत. याचाच फायदा ट्रॅव्हल्सकडून घेतला जात आहे. पुण्यासाठी आजघडीला २ हजार रुपये तर मुंबईला ३ हजार रुपये जीएसटीसह भाडे आकारले जात आहे. राज्यातील काही भागात जादा भाडे आकारल्या प्रकरणी ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात आली आहे. नांदेडमध्ये मात्र अशी कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झाली नाही. त्यामुळे प्रवाशांची ही लूट खुलेआम अशीच सुरू राहणार काय? असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे.
आजघडीला पुणे, नांदेड, पुणे या मार्गावर प्रतिदिन १५० ते २०० ट्रॅव्हल्स धावतात. मुंबईला जाणाºया ट्रॅव्हल्सचीही संख्या याहून अधिक आहे. प्रवाशांची मागणी असतानाही मुंबई आणि पुण्यासाठी रेल्वे सोडल्या जात नाही. यात रेल्वे अधिकारी व ट्रॅव्हल्स चालकांचे साटेलोटे असल्याचा आरोप खुद्द माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनीही केला होता. त्यानंतरही रेल्वे विभागाने आपल्या वेळापत्रकात कोणताही बदल केला नाही. शहरात वर्दळीच्या काळात मोठ्या संख्येने ट्रॅव्हल्स शहरात येतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. पोलिस अधीक्षकांनी त्याकडे लक्ष वेधले असले तरी जादा दराची आकारणी रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग काय कारवाई करेल याकडे लक्ष लागले आहे.