पीएम सन्मान योजनेत जिल्ह्यातील २ लाख ६० हजार शेतकरी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:30 AM2019-02-25T00:30:49+5:302019-02-25T00:32:13+5:30
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील २ लाख ६० हजार ३०४ पात्र शेतकऱ्यांचा २ हजार रुपयांचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा केला जात आहे.
नांदेड : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील २ लाख ६० हजार ३०४ पात्र शेतकऱ्यांचा २ हजार रुपयांचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा केला जात आहे. या योजनेचा जिल्हास्तरीय प्रारंभ आ. राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे रविवारी झाला.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेश येथील गोरखपूर येथे रविवारी करण्यात आला.
याप्रसंगी मान्यवरांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळत असून शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे सोयीचे होईल व कर्ज काढावे लागणार नाही, असे सांगून शेतकºयांना शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरखपूर येथून होत असलेला प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा प्रारंभ व मन की बात या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दाखविण्यात आले.
गोरखपूर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकºयांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्राच्या वतीने मुरबाडचे गौतम चिंतामण पवार यांनी प्रतिनिधित्व केले असून त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांतील शेतकºयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
नांदेड जिल्ह्यात १ हजार ५७५ गावांपैकी आठ ‘अ’ प्रमाणे एकूण खातेदार शेतकरी ७ लाख ९५ हजार ८०० आहेत. या योजनेत परिशिष्ट ‘अ’ प्रमाणे अनिवार्य माहिती संकलित झालेली गावांची संख्या १ हजार ५६८ असून परिपूर्ण असलेले पात्र शेतकरी २ लाख ८९ हजार ३५१ एवढे आहेत. त्यापैकी १ हजार ५१० गावांची माहिती एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. माहिती अपलोड केलेले पात्र शेतकरी कुटुंब २ लाख ६० हजार ३०४ असून टक्केवारी ८९.९६ एवढी आहे, अशी माहिती देण्यात आली.
या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा, तालुका, ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेची माहिती दिली. यावेळी शेतक-यांचा सन्मान करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अरविंद पांडागळे यांनी कापूस पिकाची तर कृषिनिष्ठ शेतकरी भगवान इंगोले यांनी सेंद्रिय शेतीची माहिती दिली.
कार्यक्रमास कृषी उपसंचालक माधुरी सोनवणे, तहसीलदार किरण अंबेकर, उज्ज्वला पांगरकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, एन. टी. पाटे, कृषी अधिकारी श्रीमती पूनम चातरमल उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शोभागचंद बोरा, येमूल, देसाई, संतोष बडवळे, मनोहर, शंकर पवार यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन व आभार कृषी सहाय्यक वसंत जारीकोटे यांनी केले.