खिचडीत शिजली पाल, ५८ विद्यार्थ्यांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 03:00 AM2019-07-25T03:00:42+5:302019-07-25T03:00:48+5:30
बहुतांश सर्वच विद्यार्थ्यांनी उलट्या केल्या.५६ विद्यार्थ्यांना बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बिलोली (जि. नांदेड) : सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या श्री छत्रपती हायस्कूलच्या मध्यान्ह भोजनातील खिचडीत शिजलेल्या पालीमुळे शाळेतील ५६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाला़ त्यांना उपचारासाठी बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील ८ विद्यार्थी गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक नागेश लखमावार यांनी दिली.
प्रकृती गंभीर असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शिवलिंग शंकर शबेटमोगरे (१२), श्रीकांत विठ्ठल मांगीलवार (१२), पूजा संतोष गायकवाड (१४), विजय साहेबराव, अंजनबाई (१३), मनोज संजय गरबडे (१४), सौंदर्य विनायक शिंदे (१४), स्वामी मन्मथ स्वामी (१४), महाळसा लक्ष्मण रामटक्के (१३) यांचा समावेश आहे. श्री छत्रपती हायस्कूलच्या ६०० विद्यार्थ्यांसाठी सकाळी खिचडी शिजवण्यिात आली. दुपारी १२ वाजेच्या दरम्यान पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात खिचडी देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना चक्कर येण्यास सुरुवात झाली. एका विद्यार्थिनीने खिचडीत निघालेली पाल दाखवली. बहुतांश सर्वच विद्यार्थ्यांनी उलट्या केल्या.५६ विद्यार्थ्यांना बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमावार व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले़ विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताच त्यांना सुटी देण्यात येणार आहे.