'टोकाचे पाऊल उचलत आहे'; असा संदेश पाठवून केले विष प्राशन
By शिवराज बिचेवार | Published: May 17, 2023 06:46 PM2023-05-17T18:46:22+5:302023-05-17T18:47:35+5:30
पतपेढीतील कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
नांदेड- ज्यांना उधारीवर पैसे दिले होते ते देण्यासाठी टाळाटाळ करीत होते. तर ज्यांची उधारी फेडावयाची होती त्यांच्याकडून तगादा सुरु होता. त्यामुळे या त्रासाला कंटाळून जिल्हा परिषद पतपेढीतील कर्मचारी सुनिल इंगाेले (देशमुख) यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. विष प्राशन करण्यापूर्वी देशमुख यांनी मी टोकाचे पाऊल उचलत आहे, असा संदेश पत्नीला पाठविला होता.
गोविंद कॉलनी येथील सुनिल देशमुख हे जिल्हा परिषद पतपेढीचे कर्मचारी आहेत. हे १२ मे रोजी घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाही. मधल्या काळात त्यांनी मी टोकाचे पाऊल उचलत आहे, असा पत्नीला व्हॉट्सॲपवर संदेश पाठविला होता. त्यानंतर पत्नी आणि नातेवाईकांनी व्हॉईस कॉलच्या माध्यमातून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर सुनिल देशमुख हे तरोडा ते मालेगाव रस्त्यावरील हायटेक सिटीच्या कमानीजवळ बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालविली. त्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून त्याचा फोटो काढून ठेवल्याची माहिती आहे. याबाबत त्यांची पत्नी सरीता इंगोले (देशमुख) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन बी.के.पाटील, शिवाजी लाकडे, पुंडलिक देशमुख रा. चिकाळा, शंतनू देशमुख रा.देगलूर, साई मालेगाव आणि बुठला नगरचे सर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
देशमुख सापडले होते आर्थिक संकटात
देशमुख यांनी काही जणांना उधारीवर पैसे दिले होते. तर काही जणांचे त्यांच्यावर पैसे होते. परंतु ज्यांना उधार दिले ते पैसे देण्यास तयार नव्हते. अन् ज्यांच्याकडून घेतले ते धमक्या देत होते. त्यामुळे या त्रासाला कंटाळून त्यांनी विष प्राशन केले. असे पत्नीच्या तक्रारीत नमूद आहे.