पोलीस वसाहतींचे रुपडे पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:48 AM2019-02-02T00:48:39+5:302019-02-02T00:52:24+5:30
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेवून अहोरात्र डोळ्यांत तेल घालून सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी पाडणाऱ्या पोलीस कर्मचा-यांचे कुटुंब मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस वसाहतीत मोडकळीस असलेल्या निवासस्थानांमध्ये जीव मुठीत घेवून राहत आहेत़
नांदेड : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेवून अहोरात्र डोळ्यांत तेल घालून सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी पाडणाऱ्या पोलीस कर्मचा-यांचे कुटुंब मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस वसाहतीत मोडकळीस असलेल्या निवासस्थानांमध्ये जीव मुठीत घेवून राहत आहेत़ गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचा-यांच्या या समस्येकडे कुणीही गांभीर्याने पाहिलेच नाही़ त्यात आता पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीतून या घरांच्या डागडुजीसाठी २ कोटी ६१ लाख रुपये मंजूर झाले आहेत़ त्यामुळे पोलीस निवासांना आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत़
जिल्ह्यात आजघडीला पोलीस दलात तीन हजारांवर कर्मचारी कार्यरत आहेत़ ड्युटीच्या वेळा अन् अवेळी जेवण, पुरेशी झोप न मिळणे यामुळे पोलीस कर्मचारी अगोदरच तणावात आयुष्य जगत असतात़ प्रकृतीकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांना अनेक आजारही बळावतात़ दिवसभर कर्तव्यावरुन घरी गेल्यानंतरही मात्र घराची अवस्था पाहता त्यांना शांतपणे झोप लागणे दुर्लभच ! मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहत इमारतीचा कोणता भाग कधी कोसळेल आणि अपघात होईल याची शाश्वती नसल्यामुळे पोलीस कर्मचाºयांचे कुटुंब जीव मुठीत घेवूनच राहतात.
त्यातही गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस वसाहतींची ड्रेनेजलाईन, सांडपाण्याची व्यवस्था याची अवस्थाही फार वाईट आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात येतो़ परंतु केवळ अधिकाºयांच्या निवासांना झळाळी देण्यात येत असल्यामुळे इतर कर्मचाºयांच्या समस्या झाकोळल्या जातात़ असा आजपर्यंतचा कर्मचाºयांना अनुभव आलेला आहे़ अनेक ठिकाणी स्लॅब कोसळू नये म्हणून त्याला लाकडाचा आधार देण्यात आला आहे़
त्यात काही दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी या मोडकळीस आलेल्या कर्मचाºयांच्या निवासस्थानांची पाहणी केली होती़ त्याचवेळी त्यांनी या घरांची दुरुस्ती करण्यास प्राधान्य दिले़ त्यानंतर या घरकुलांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून २ कोटी ६१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत़ या निधीतून जिल्हाभरातील कर्मचाºयांच्या २०३ आणि १० अधिका-यांच्या निवासस्थानांची डागडुजी करण्यात येणार आहे़ त्याचबरोबर पोलीस वसाहतीतील ड्रेनेज आणि इतर समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत़ त्यामुळे तब्बल २० वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीस कर्मचा-यांच्या निवासस्थानांना ‘अच्छे दिन’ येणार आहेत़
- पोलीस कर्मचा-यांच्या निवासांची अवस्था अतिशय दयनीय आहे़ जिल्हाभरातील पोलीस निवासांच्या दुरुस्तीच्या आणि नवीन बांधकामांच्या विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे़ पोलीस कर्मचा-यांना घरात गेल्यानंतर शांतपणे झोप लागावी, त्यांच्या कुटुंबातील वातावरण आनंदी रहावे, यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबविण्यात येत आहेत़ पोलीस ठाण्यांमध्येही कर्मचा-यांच्या मनोरंजनासाठी काय करता येईल ? या दृष्टीनेही विचार सुरु असल्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव म्हणाले़
४पोलीस वसाहतीत पोलीस कर्मचाºयाला एक खोली, स्वयंपाकगृह आणि शौचालय असते़ तर हेडकॉन्स्टेबल आणि अधिकाºयांना दोन खोल्या, स्वयंपाकगृह आणि शौचालय असते़ ए,बी आणि सी असे निवासांचे वर्गीकरण करण्यात येते़ पोलीस वसाहतीतील सुविधांबाबत अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येतो़ परंतु, कर्मचाºयांच्या निवासस्थानांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्षच करण्यात येते़