पोलिसांनी हद्द ओलांडली; तक्रार नंतर, आधी हद्द कुठली हे सांगा? शहर-ग्रामीणचा वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:23 AM2021-09-08T04:23:52+5:302021-09-08T04:23:52+5:30
नांदेड शहराच्या चहूबाजूने असलेल्या ग्रामीण ठाण्याच्या विविध हद्दीवर ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून हद्द निश्चित करण्यावरून अनेक वेळा वाद होतो; परंतु अशा ...
नांदेड शहराच्या चहूबाजूने असलेल्या ग्रामीण ठाण्याच्या विविध हद्दीवर ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून हद्द निश्चित करण्यावरून अनेक वेळा वाद होतो; परंतु अशा वेळी तक्रारकर्त्यांना शहरी-ग्रामीणच्या फेऱ्यात अडकावे लागते. शेवटी कंटाळून अनेक जण तक्रार नोंदविण्यासाठी पुन्हा ठाण्यात जात नाहीत, असे अनेक प्रकार पुढे आलेले आहेत.
मोबाइल चोरीची तक्रार घेण्यास टाळाटाळ...
मोबाइल चोरीप्रकरणी भाग्यनगर ठाण्यात गेलाे असता तुम्ही विमानतळ ठाण्याच्या हद्दीत राहता तर तिकडेच तक्रार करा आणि विमानतळ ठाण्याकडून मोबाइल वर्कशॉपला चोरी गेला तर भाग्यनगरला तक्रार करा, असा सल्ला तेथील कर्मचाऱ्यांनी दिला. त्यामुळे मी मोबाइल चोरीची तक्रार करणे टाळून नवीन मोबाइल घेतला, असे आनंदनगर येथील कदम यांनी सांगितले.
ग्रामीण आणि इतवारा ठाण्याचा हद्दीवरून होणारा वाद सर्वश्रुत आहे. त्यात गोदावरी नदीपात्रात एखादा मृतदेह आढळला अथवा घटना घडली तर ती कोणाच्या हद्दीत यावरून अगोदर वादंग सुरू होते. काही तासांनंतर हा वाद मिटून मग प्रकरण मार्गी लागते, अशा घटना नेहमीच्याच आहेत.