कारखानदाराकडून १० लाखांची लाच घेणाऱ्या जीएसटी उपायुक्ताला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:12 PM2020-01-08T12:12:28+5:302020-01-08T12:22:41+5:30
कारखान्याचे परताव्यापोटी ३ कोटी ५३ लाख रुपये परत येणार होते़
नांदेड : कारखान्यासाठी खरेदी केलेली मशिनरी आणि इतर साहित्यासाठी भरण्यात आलेल्या व्हॅटचा परतावा व्याजासह परत देण्यासाठी अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जीएसटी उपायुक्त बाळासाहेब देशमुख यांना मंगळवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. कारखान्याचे परताव्यापोटी ३ कोटी ५३ लाख रुपये परत येणार होते़
पूर्णा येथील एका कारखानदाराने २०१३ मध्ये मशिनरी आणि इतर साहित्य खरेदी केले होते़ त्यावेळी व्हॅट ही करप्रणाली होती़ यावेळी भरण्यात आलेला व्हॅट व्याजासह परत मिळविण्यासाठी परभणी येथील वस्तू व सेवाकर कार्यालयातून फाईल मागवून नागपूर कार्यालयाकडे अंतिम मंजुरीला पाठविण्यासाठी जीएसटी उपायुक्त बाळासाहेब देशमुख यांनी ५ जानेवारीला कारखानादारासोबत झालेल्या पहिल्याच भेटीत दहा लाख रुपयांची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली़ ६ जानेवारी रोजी सायंकाळी हॉटेल ड्रिमलँड येथे खोली क्रमांक २०६ मध्ये देशमुख यांनी लाच स्वीकारली होती़
या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ मंगळवारी देशमुख यांना न्या.़ के. एऩ गौतम यांच्यापुढे हजर करण्यात आले़ यावेळी न्यायालयाने देशमुख यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़ देशमुख हे पूर्वी पोलीस उपनिरीक्षक या पदावर होते़ पुढे स्पर्धा परीक्षेद्वारे ते सेल टॅक्स विभागात रुजू झाले होते़
असा रचला होता सापळा
देशमुख यांनी तक्रारदाराला दहा लाख रुपये घेऊन हॉटेल ड्रिमलँडच्या खोली क्रमांक २०६ मध्ये येण्यास सांगितले़ तक्रारदार पैशाची बॅग घेऊन त्यांच्या खोलीत गेले़ त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तीन कर्मचारी गॅलरीत थांबले होते़ तक्रारदार खोलीत गेल्यानंतर देशमुख यांनी पैशाला हात न लावता ती बॅग समोरच्या टेबलवर ठेवण्यास सांगितले़ त्यानंतर तक्रारदारालाच ती बॅग आपल्या आलमारीत ठेवायला लावली़ त्यानंतर तक्रारदाराने बाहेर पडताच खिशातील रुमाल खाली टाकून एसीबीच्या कर्मचाऱ्यांना इशारा केला़ तोच कर्मचाऱ्यांनी देशमुख यांना ताब्यात घेतले़
उस्मानाबादसह इतर ठिकाणच्या संपत्तीची चौकशी
देशमुख हे यापूर्वी कार्यरत असलेल्या प्रत्येक ठिकाणच्या संपत्तीची चौकशी एसीबीकडून सुरु करण्यात आली आहे़ देशमुख हे उस्मानाबादचे असल्यामुळे त्या ठिकाणीही जमीन व इतर मालमत्तांची चौकशी सुरु झाली आहे़ त्याचबरोबर त्यांच्या व कुटुंबियांची बँक खात्याची झाडाझडतीही सुरु करण्यात आली आहे.