पोलिसाचे ओळखपत्र चोरले; बँकेत खाते काढून केला तब्बल साडेचार कोटींचा व्यवहार
By शिवराज बिचेवार | Published: April 21, 2023 04:21 PM2023-04-21T16:21:31+5:302023-04-21T16:25:22+5:30
चक्क पोलिसाच्या नावे बनावट खाते अन् कोट्यवधींचे व्यवहार; वजिराबाद ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नांदेड : चक्क पोलिस कर्मचाऱ्याचे ओळखपत्र चोरून बनावट कागदपत्राद्वारे मल्टीस्टेट अर्बन बँकेत खाते काढल्यानंतर या खात्याच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांत तब्बल साडेचार कोटींचे व्यवहार करण्यात आले. ही बाब समजल्यानंतर सदरील पोलिस कर्मचाऱ्याला धक्का बसला असून या प्रकरणात चार जणांविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सोमनाथ जगन्नाथ पत्रे हे पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर आहेत. त्यांचे आधारकार्ड, मतदान ओळखपत्राची झेरॉक्स आणि फोटो चोरण्यात आले होते. त्याद्वारे बनावट कागदपत्रे तयार करुन १३ मे २०१४ रोजी महावीर चौक येथील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.अहमदनगर मध्ये त्यांच्या नावाने खाते काढण्यात आले. या खात्यावर पत्रे यांची बनावट सही आणि अंगठा वापरुन आरोपींनी २० मार्च २०२३ पर्यंत जवळपास ४ कोटी ४६ लाख १९ हजार ५४१ रुपयांचे व्यवहार केले. विशेष म्हणजे, हे व्यवहार आणि खात्याबाबत पोलिस कर्मचारी पत्रे यांना काहीच माहिती नव्हती. मागील महिन्यात पत्रे यांना ही बाब कळाल्यानंतर त्यांनी चौकशी केली. बनावट खात्याबाबत माहिती काढली. तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. आर्थिक गुन्हे शाखेने तपास केल्यानंतर या प्रकरणात पो.कॉ.सोमनाथ पत्रे यांच्या तक्रारीवरुन चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि व्ही.एस.आरशेवार हे करीत आहेत.
शाखाधिकाऱ्यालाही केले आरोपी
श्री रेणुका मल्टीस्टेट अर्बन क्रेडिट को-आपरेटिव्ह सोसायटीचे शाखाधिकारी जितेंद्र रामभाऊ थेटे रा.पारवाला जि.जालना, गोवर्धन तुकाराम महाजन रा.इंजनगाव, चाळीसगाव, विलास श्रीराम वाघमारे रा.जंगमवाडी, नांदेड आणि कुलदीप प्रल्हाद वानखेडे रा.दत्तनगर, नांदेड अशा चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.