रक्ताच्या उलट्या होवून उपचारादरम्यान पोलीस नाईकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 11:40 AM2021-12-14T11:40:19+5:302021-12-14T11:41:03+5:30
११ डिसेंबर रोजी सायंकाळी राहते घरी अचानक रक्ताच्या उलट्या झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले
नांदेड: नांदेडच्या 'हडको' परिसरातील मुळ रहिवासी व सोनखेड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या ३६ वर्षीय पोलीस नाईक अमोल उगवे (बक्कल नंबर ४९८) यांचा रक्ताच्या उलट्या होवून उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १३ डिसेंबर रोजी नांदेड शहरातील एका खाजगी रूग्णालयात घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या 'सिडको' वसाहतीअंतर्गत असलेल्या एनडी. ए- ११९ 'हडको' परिसरातील मुळ रहिवासी असलेले अमोल भाऊलाल उगवे (बक्कल नं.४९८) हे सोनखेड (ता. लोहा जि. नांदेड) येथील पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून नेमणुकीला होते. दरम्यान, पो.ना. अमोल उगवे यांना ११ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजे दरम्यान त्यांच्या राहते घरी अचानक रक्ताच्या उलट्या होवू लागल्या. त्याचवेळी, नातेवाईकांनी पोलीस नाईक अमोल उगवे यांना उपचाराकरिता नांदेड शहरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान १३ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेदरम्यान, डॉक्टरांनी पो. ना. अमोल उगवे यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले, अशी माहिती ठाणे अंमलदार प्रविण केंद्रे व मदतनीस महिला पो. कॉ. ज्योती आंबटवार यांनी दिली आहे.
याप्रकरणी अविनाश भाऊलाल उगवे (रा. एनडी. ए-११९, हडको, नांदेड) यांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल शेख जावेद हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. विशेष बाब म्हणजे, पोलीस नाईक अमोल उगवे यांच्या पार्थिवावर १३ डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठवाजेदरम्यान, पोलीस दलाच्या वतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी डीवायएसपी. डॉ. सिध्देश्वर भोरे व नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचेसह 'रेल्वे'चे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, सोनखेड येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पो. नि. महादेव मांजरमकर, पोउपनि. चंदन परिहार तसेच नांदेड पोलीस दलातील असंख्य पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. प्रारंभी, 'पोलीस' दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून पो. ना. अमोल उगवे यांना शोकसलामी देण्यात आली. त्याचवेळी, नांदेड पोलीस दलाच्यावतीने व नवीन नांदेडातील विविध राजकीय पक्षाचे तथा सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पो. ना. दिवंगत अमोल उगवे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आईवडील व दोन भाऊ असा परिवार आहे.