फरार अब्बू शूटरला पकडण्यासाठी नांदेड पोलिसांनी केला गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 08:40 AM2023-09-29T08:40:20+5:302023-09-29T08:40:40+5:30
सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपीस पकडले; स्थागुशाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : अनेक वर्षांपासून फरार असलेल्या अब्बू शूटर उर्फ शेख आवेज या आरोपीस पकडण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी दुपारी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग केला. आरोपी हाती लागत नसल्याने पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने यांनी गोळीबार करीत आरोपीस ताब्यात घेतले. ही थरारक घटना डी मार्ट परिसरात घडली.
मागील अनेक वर्षांपासून फरार असलेला शेख आवेज उर्फ अब्बू शुटर नांदेडमध्ये असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी डी. मार्ट परिसरात सापळा लावला. पोलिसांची कुणकुण लागताच आरोपीने पोलिसांवर खंजरने वार करुन तेथून पळ काढला. जवळच्या शाळेच्या दिशेने तो पळाला. अब्बू शूटर पुढे पोलिस पाठीमागे असा सिनेस्टाईल पाठलाग करीत असतानाच पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तरीही तो थांबत नसल्याने एपीआय माने यांनी आरोपीच्या दिशेने गोळीबार केला. त्यात तो जखमी झाला. त्यानंतर आरोपीस ताब्यात घेत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. दीपक भोकरे हा दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. अप्पर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव, पाेलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.