पोलिस पाटलाने ग्रामपंचायतमध्ये संपवले जीवन; पीएसआयने त्रास दिल्याचा व्हिडीओत उल्लेख
By शिवराज बिचेवार | Updated: July 22, 2024 18:55 IST2024-07-22T18:55:07+5:302024-07-22T18:55:42+5:30
मृत्यूपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडीओ करत सांगितले कारण

पोलिस पाटलाने ग्रामपंचायतमध्ये संपवले जीवन; पीएसआयने त्रास दिल्याचा व्हिडीओत उल्लेख
निवघा बाजार (जि.नांदेड)- हदगाव तालुक्यातील पेवा येथील पोलिस पाटील बालाजी केशवराव जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या एका खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून जाधव यांनी मृत्यूपूर्वी केलेल्या व्हिडीओत त्यांनी हदगावचे पोलिस उपनिरिक्षक भडीकर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
पोलिस पाटील बालाजी जाधव हे सोमवारी सकाळी घराकडून ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. त्यांना काही कामानिमित्त हदगाव येथे जायचे होते. ते कार्यालयात आले तेव्हा बंद होते. यावेळी त्यांनी काही दिवसापूर्वी गावात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची झोपण्याची व्यवस्था म्हणून अंथरुन-पांघरण आणले होते. ते ग्रामपंचायतच्या एका खोलीत होते. ते नेण्यासाठी त्यांनी खोली उघडायला लावली. त्यानंतर छताला नायलॉन दोरीने गळफास घेतला. बराचवेळ झाला तरी पेालिस पाटील बाहेर का आले नाही म्हणून ग्रामस्थांनी आत डोकावून पाहिले असता त्यांना जाधव यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. छताच्या कडीपर्यंत हात पोहचत नसल्याने त्यांची खुर्च्या एकमेकात टाकून छताला दोरी बांधली होती. दरम्यान मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ केला होता. या व्हिडीओमध्ये ते मृत्यूस पोलिस उपनिरिक्षक भडीकर जबाबदार असल्याचे म्हणत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे हदगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. मयत जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.
ज्येष्ठ नागरीकांची सेवा अपुरी राहिली
माझ्या मृत्यूला पीएसआय भडीकर हे जबाबदार आहेत. त्यांनी माझ्यावर एवढा अन्याय करायला नको होता. पूर्ण माहिती देवूनही घटनेची मी माहिती लपवून ठेवली असे त्यांनी म्हटलं. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. गावाने शांततेत रहावं. माझी ज्येष्ठ नागरीकांची सेवा होती ती अपुरी राहिली. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो. असे जाधव यांनी मृत्यूपूर्वी केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.