कौडगाव वाळू घाटावर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:01 AM2018-03-30T01:01:48+5:302018-03-30T11:54:45+5:30
येथील गोदावरी पात्रात पोलीस उपअधीक्षक नुरुल हसन यांनी तीन पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह बुधवारी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात ९ पोकलेनसह वाळूने भरलेले ७ हायवा ट्रक, ट्रॅक्टर व १४ टिप्पर इ. वाहने जप्त केली. १५ आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरी : येथील गोदावरी पात्रात पोलीस उपअधीक्षक नुरुल हसन यांनी तीन पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह बुधवारी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात ९ पोकलेनसह वाळूने भरलेले ७ हायवा ट्रक, ट्रॅक्टर व १४ टिप्पर इ. वाहने जप्त केली. १५ आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.
सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी गुरुवारी सायंकाळी उमरी ठाण्यात ही माहिती दिली. गुप्त माहितीवरुन साध्या वेषात व वेगवेगळ्या साध्या वाहनातून गोदावरी नदीपात्रातील कौडगाव वाळूघाटावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. यामध्ये उमरीसह, धर्माबाद, कुंडलवाडी व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या कर्मचा-यांनी छाप्यात सहभाग घेतला.
एकूण ४० पोलीस कर्मचाºयांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यावेळी १० हजार ब्रास वाळू साठा ज्याची किंमत ३ कोटी रुपये असून सदरचा साठा जप्त करण्यात आला. वाहने व वाळूसाठा याची एकूण किंमत १० कोटी ९ लाखांचा माल जप्त करण्यात आला. उमरी तहसीलचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांचेसह गुरुवारी दिवसभर वाळू क्षेत्र व साठ्याचे मोजमाप करण्यात आले. कौडगाव वाळू घाटावरुन १ हेक्टर क्षेत्रातून वाळू उपसा करण्याचा परवाना असताना तब्बल तीनपट क्षेत्रातून वाळू उपसा करुन शासनाचा महसूल बुडविण्याचे नुरुल हसन यांनी सांगितले. वाळूघाटावरून १५ आरोपींना पोलिसांनी पकडले तर मुख्य ठेकेदार फरार झाल्याचे सांगण्यात आले. सदरील कारवाईमुळे वाळूघाटावरील दबंगगिरीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, एकूण २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात गणेश पाटील, संभाजी पवार, युवराज पाटील पुणेगाव, राजू पाटील महाटी, प्रभू पाटील महाटी , आराव पाटील पुयडवाडी, राम पाटील वासरी आदींचा समावेश आहे. पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांनी दिली .