सचखंडमध्ये सापडलेल्या दोन्ही मुलांच्या पालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:14 AM2021-01-09T04:14:25+5:302021-01-09T04:14:25+5:30
दक्षिम मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणारी गाडी संख्या ०२७१६ अमृतसर-हुजूर साहिब नांदेड सचखंड विशेष एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर असतांना तिकीट ...
दक्षिम मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणारी गाडी संख्या ०२७१६ अमृतसर-हुजूर साहिब नांदेड सचखंड विशेष एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर असतांना तिकीट चल निरीक्षक प्रमोद कुमार यांना दोन मुले डी-१ कोचमध्ये झोपलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी सदर मुलांची अधिक चौकशी केली असता ते या गाडीने झोपेमध्ये पुढे आले असल्याचे लक्षात आले. दरम्यान, प्रमोद कुमार यांनी दोन्ही मुलांना औरंगाबाद येथे रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या उप-निरीक्षकांच्या स्वाधीन केले. आर.पी.एफ. औरंगाबाद यांनी अधिक चौकशी केली असता त्यांना त्यांच्या वडिलांचा नंबर सापडला. मुलांचे वडील राकेश कुशवाह यांच्याशी मोबाईलवर बोलणे झाले असता सदर दोन्ही मुले कुशवाह याच्या सोबत ललितपुर येथून इंदोरला जाण्यासाठी प्रवास करत असल्याचे लक्षात आले.
राकेश कुशवाह हे बिना रेल्वे स्टेशनवर पाणी घेण्यासाठी खाली उतरले आणि बाटलीत पाणी भरण्यात मग्न असताना सचखंड एक्सप्रेस पुढील प्रवासास निघून गेली. हे दोन्ही मुले झोपेत असाल्यामुळे पुढे आली. या मुलांचे नाव अरुण वय- ९ वर्ष व अभिषेक वय- ६ वर्ष अशी आहेत. नियमानुसार दोन्ही मुलांना बाल कल्याण समिती, औरंगाबाद यांच्या समोर पुढील कार्यवाही करिता सादर केले. तेव्हा मुलाचे वडील राकेश कुशवाह हे आपल्या मुलांना घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी औरंगाबाद येथे हजर झाले. दरम्यान, सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून त्यांनी मुलांना सोबत घेतले. कुशवाह यांनी तिकीट चल निरीक्षक प्रमोद कुमार, आरपीएफचे पोलीस निरीक्षक अरविंद शर्मा आणि संपूर्ण रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.