नांदेडमध्ये समन्वयाने होणार पोलिसांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:27 AM2018-05-28T00:27:05+5:302018-05-28T00:27:05+5:30
पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सुखद धक्का देत कर्मचा-यांच्या बदल्या आता समन्वयाने करण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून त्यामुळे पोलीस कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड :पोलीस दलात सध्या बदल्यांचा हंगाम सुरु आहे़ त्यामुळे प्रत्येकजण आपल्या आवडीचे ठाणे मिळविण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत़ तर पसंतीच्या ठिकाणी बदली मिळेल की नाही? यामुळेही अनेक कर्मचारी तणावात आहेत़ त्या सर्वांना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सुखद धक्का देत कर्मचा-यांच्या बदल्या आता समन्वयाने करण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून त्यामुळे पोलीस कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़
मे महिन्यात सर्व विभागांमध्ये बदल्यांचा हंगाम सुरु होतो़ त्यामध्ये पोलीस दलाचाही समावेश असतो़ त्यामुळे या महिन्यात कार्यकाळ पूर्ण करणारे सर्वच कर्मचारी बदलीच्या तणावात असतात़ त्यात पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी ज्या ठिकाणी बदली करतील त्याच ठिकाणी कर्मचाºयांना रुजू व्हावे लागते़ त्यामुळे कुटुंब, मुलांचे शिक्षण एका टोकाला अन् नोकरी दुसºया टोकाला अशी विचित्रावस्था कर्मचाºयांची होते़
त्याचा परिणाम कर्मचाºयांच्या कार्यक्षमतेवर होतो़ त्यातच कामाच्या तणावामुळे त्यांना पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते़ त्यातून पसंतीच्या ठिकाणी बदली मिळविण्यासाठी कर्मचारी शक्य ते सर्व हातखंडे वापरतात़ यावर तोडगा म्हणून पोलीस अधीक्षक मीना यांनी पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या समन्वयाने करण्याचा निर्णय घेतला आहे़
त्यामध्ये रिक्त पदे, पदांची आवश्यकता, उपलब्धता आणि पोलीस कर्मचारी यांनी दिलेली पसंतीची ठाणी या सर्वांची सांगड घालून सर्वसाधारण बदल्या केल्या जाणार आहेत़ पोलीस कर्मचाºयांनी बदलीसाठी केलेला अर्ज घेवून २८ मे रोजी सकाळी ८ वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हजर राहावयाचे आहे़ एकाच तालुक्यात खंडित व अखंडित दहा वर्षे सेवा कर्मचाºयाची झाली असेल आणि इतर शाखेत तीन वर्षे सेवा पूर्ण केली आहे़ अशा कर्मचाºयांनी बदलीसाठी अर्ज केले असतील तर त्यांना २९ व ३० मे रोजी बोलाविण्यात येणार आहे़ या ठिकाणी समन्वयाने कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात येणार आहेत़ त्यामुळे पसंतीचे ठाणे मिळण्यासाठी कर्मचाºयांना कराव्या लागणाºया कसरतीतून यंदा सुटका मिळणार आहे़ त्याचबरोबर बदलीची प्रक्रियाही पारदर्शक होणार आहे़ त्यामुळे या निर्णयाचे पोलीस कर्मचाºयांनी स्वागत केले आहे़