पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:17 AM2021-04-24T04:17:51+5:302021-04-24T04:17:51+5:30
मागील वर्षी कोरोनाचे संकट आल्यानंतर आरोग्य यंत्रणा व पोलीस यंत्रणेवर अधिक जबाबदारी आली. कोरोनामुळे लॉकडाऊन लावल्यानंतर प्रत्येक गावात, ...
मागील वर्षी कोरोनाचे संकट आल्यानंतर आरोग्य यंत्रणा व पोलीस यंत्रणेवर अधिक जबाबदारी आली. कोरोनामुळे लॉकडाऊन लावल्यानंतर प्रत्येक गावात, शहरात रस्त्या, रस्त्यांवर पोलीस उभे राहिले. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर त्यांनी नियंत्रण ठेवले. २०२० हे वर्षच पोलिसांसाठी अत्यंत खडतर ठरले. त्यानंतर कोरोना महामारीचे सावट कमी होत असतानाच पुन्हा फेब्रुवारी २०२१ अखेर कोरोनाची दुसरी लाट आली. पाहता पाहता या लाटेने हजारो नागरिकांना आपल्या विळख्यात घेतले. शहरापासून ते ग्रामीण भागात वाडी, वस्ती, तांड्यावर नागरिक कोरोनाने बाधित होऊ लागले. उपचारासाठी यंत्रणा तोकडी पडू लागली. रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले. अशा संकट काळात पोलिसांवर पुन्हा जबाबदारी वाढली. मागील दोन महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे पोलिसांना रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभे राहावे लागत आहे. अनेक तास ड्युटी असल्याने ते आपल्या कुटुंबीयांना वेळ देऊ शकत नाहीत. तसेच कोरोनापासून बचाव करणाऱ्या लसीकरणासाठी त्यांना वेळ देता येत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १० टक्के पोलिसांनीच डोस घेतला आहे.
चौकट- बाबा, आम्ही घरी वाट पाहतोय...
१. मागील वर्षी उन्हाळ्यात पण पप्पाला ड्युटीमुळे घरी थांबता आले नाही. यंदाच्या उन्हाळ्यात पण तशीच वेळ आहे. पप्पाला सारखं, सारखं ड्युटीवर जावे लागते. त्यामुळे ते आम्हाला वेळ देऊ शकत नाहीत.
- रूद्र शिंदे, नांदेड,
२.कोरोनामुळे पप्पाला वर्षभरापासून घरी वेळ देता आला नाही. नेहमीच ड्युटी असल्याने आम्हाला ते जास्त वेळ देऊ शकत नाहीत. कधी संपेल हे कोरोनाचे संकट. आम्हाला कोणताचा आनंद घेता येत नाही.
- साक्षी बरगे, नांदेड.
३. सगळ्यांच्या रक्षणासाठी माझे बाबा ड्युटीवर जातात. त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो. या काळात त्यांची गरज आहे म्हणून जास्तीचे काम करावे लागते. आमचे बाबा कधी थकत नाहीत.
- श्रेया वड, नांदेड.
४. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये पप्पाला नेहमीच ड्युटी लागत आहे. सुट्टी मिळत नाही. त्यामुळे आम्हाला त्यांची चिंता असते. ड्युटी संपून घरी आल्यानंतर ते एकटेच बाजूला राहतात.
- साक्षी कणके, नांदेड.