ग्रामीण भागातील राजकीय आखाडा पेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:34 AM2020-12-12T04:34:49+5:302020-12-12T04:34:49+5:30
नांदेड : राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम राज्याचे निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार ...
नांदेड : राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम राज्याचे निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यातील १ हजार १५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकीय आखाडा पेटणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये यंदा नव्या राजकीय समीकरणामुळे चुरस दिसणार आहे.
एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते. मात्र, कोविड १९ ची परिस्थिती उद्भवल्याने १७ मार्च २०२० रोजी हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासह डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी आता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील १ हजार १५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. शासकीय सुटीचा दिवस म्हणजेच २५, २६ व २७ डिसेंबर हे दिवस वगळून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार असून त्याची छाननी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ पासून होईल. तर ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी दुपारी ३ पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते ५.३० यावेळेत मतदान आणि १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
चौकट ........
मुखेड तालुक्यातील सर्वाधिक १०९ ग्रामपंचायतींचा समावेश
१५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागात यंदा कमालीची चुरस दिसणार आहे. जिल्ह्यात मुखेड तालुक्यात सर्वाधिक १०९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. त्या पाठोपाठ हदगाव १०८, कंधार ९८, देगलूर ८५, लोहा ८४, नायगाव ६८, नांदेड ६५, बिलोली ६४, भोकर ६३, उमरी ५७, हिमायतनगर ५०, मुदखेड ४५, अर्धापूर ४३, धर्माबाद ४०, किनवट २६, तर माहूर तालुक्यातील १० ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होईल.