मराठा आरक्षण मिळाल्यास या! राजकीय नेत्यांना पुन्हा गावबंदी, मेंढल्यात पदाधिकाऱ्यांना अडविले
By श्रीनिवास भोसले | Published: January 22, 2024 07:26 PM2024-01-22T19:26:49+5:302024-01-22T19:28:02+5:30
आरक्षण मिळालं की तुम्ही हक्कानं या स्वागत करू...
नांदेड: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कुच करत असतानाच गावागावात आता राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली जात आहे. यापूर्वी केलेली गावबंदी मागे घेतली होती. परंतु, आंदोलनकर्ते जसजसे मुंबई जवळ करत आहेत, तसतसे गावातील वातावरणही तापत आहे. अर्धापूर तालुक्यातील मेंढला बु. येथे गेलेल्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना गावात प्रवेश नाकारून माघारी पाठविले.
आगामी लाेकसभा, विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून संघटनात्मक बांधणीवर जोर दिला जात आहे. त्यासाठी गावात जाऊन गावकऱ्यांची अडचणी समजून घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर पोलिस पाटील म्हणून निवड झालेल्यांचा सत्कार, विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा सपाटा नेते मंडळींनी सुरू केला आहे. सोमवारी अर्धापूर तालुक्यातील मेंढला बु. येथे एका राजकीय पक्षाचे काही पदाधिकारी गेले असता त्यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. गावात गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही बैठक न घेता माघारी परतावे लागले. जरांगे पाटील मुंबई जवळ करत असताना आता गावागावात राजकीय नेत्यांनी कोंडी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आमदार, खासदा, मंत्री यांना गावापासून चार हात दूर रहावे लागेल, असे चित्र दिसत आहे.
आरक्षण मिळालं की तुम्ही हक्कानं या स्वागत करू...
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील जीवाची बाजी लाऊन मुंबईकडे निघाले आणि तुम्ही पक्षाच्या कामासाठी गावात येता. आम्हाला कोणताही पक्ष नाही. त्यामुळे विनंती करतो, तुम्ही गावात येवू नका असे खडेबोल मराठा बांधवांनी राजकीय पदाधिकाऱ्यांना सुनावले. आरक्षण मिळेपर्यंत गावात येवू नका, आरक्षण मिळाले की या आम्हीच तुमचे स्वागत करू, असे आवाहनदेखील मराठा बांधवांनी या राजकीय नेत्यांना केले.