महापालिकेच्या हद्दवाढीवरुन राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:40+5:302021-06-25T04:14:40+5:30
भाजपने या मुद्द्यावर विरोधी पक्षनेत्याच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. यापूर्वी समाविष्ट झालेल्या गावामध्ये मूलभूत सुविधा पुरवता आलेल्या ...
भाजपने या मुद्द्यावर विरोधी पक्षनेत्याच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. यापूर्वी समाविष्ट झालेल्या गावामध्ये मूलभूत सुविधा पुरवता आलेल्या नाहीत. विशेष म्हणजे महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता हद्दवाढी समाविष्ट होणाऱ्या भागांचा कधी विकास होईल? हा प्रश्नच आहे. प्रस्तावित हद्दवाढीच्या गावामध्ये तीन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुका होण्यापूर्वीच हद्दवाढीचा विषय मंजूर केला असता तर निवडणुकांचा खर्च वाचला असता, असेही नमूद केले आहे. या हद्दवाढीस विरोध करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दुसरीकडे महाआघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे नांदेड-उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनीही या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. वाडीला स्वतंत्र नगरपंचायत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासाठी मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाडी बु. चा काही भाग मनपात समाविष्ट होत अहे. मूळ गाव व शेतीक्षेत्र वगळून हद्दवाढीस समर्थन असल्याचे युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी सांगितले. वाडीत १ हजार एकरहून अधिक भागाचे शहरीकरण झालाे आहे. पाच वर्षांपासून या भागात जमिनीचे अकृषिक होत नाही. बांधकाम परवानगी मिळत नाही. त्यामुळे मनपात समाविष्ट झाल्यास या भागाचा विकास होईल, असेही त्यांनी सांगितले.