खुर्ची टिकविण्यासाठी राजकारण नको-माजीमंत्री कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:52 PM2018-01-08T23:52:30+5:302018-01-08T23:52:33+5:30
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अथवा आपली खुर्ची टिकविण्यासाठी राजकारण न करता पक्षाच्या धोरणात्मक निर्णयानुसार काम करा, अशा कानपिचक्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी पक्षातील पदाधिका-यांना दिल्या़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अथवा आपली खुर्ची टिकविण्यासाठी राजकारण न करता पक्षाच्या धोरणात्मक निर्णयानुसार काम करा, अशा कानपिचक्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी पक्षातील पदाधिका-यांना दिल्या़
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक घेतली़ यावेळी ते बोलत होते़ बैठकीस आ़विक्रम काळे, सरचिटणीस बस्वराज पाटील, गंगाधरराव कुंटूरकर, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, शहर जिल्हाध्यक्ष डॉ़ सुनील कदम, दत्ता पवार, कार्याध्यक्ष जीवन पाटील घोगरे, फेरोज लाला, कल्पना पाटील डोंगळीकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, रऊफ जमीनदार, वसंत सुगावे, विश्वजित पावडे यांची उपस्थिती होती़
यावेळी माजी मंत्री कदम यांनी पक्षनेत्यांना चांगलेच फैलावर घेतले़ ते म्हणाले, स्वत:च्या हितासाठी राजकारण करून आज आंदोलने उभी केली जात असतील तर हीच जनता उद्या तुम्हाला धडा शिकवेल़ त्यामुळे स्वार्थ बाजूला ठेवून शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आंदोलन करा़
तसेच स्थानिक पातळीवरील निर्णय घेताना, स्थानिकच्या ज्येष्ठ, अनुभवी नेत्यांशी सल्लामसलत करत जा, असा टोलाही कदम यांनी लगावला़ मी शरदचंद्र पवार यांच्यासोबत चाळीस वर्षांपासून काम करतो़ जिल्ह्यात धोरणात्मक निर्णय घेताना प्रदेश कार्यकारिणीकडून ज्येष्ठांना डावलले जात असेल तर पवार यांना ही बाब कळवावी लागेल असा सुचक इशाराही त्यांनी दिला़ पदाधिकाºयांनी काम करीत असताना पक्षाकडून येणारा अजेंडा राबवावा, धोरणात्मक पद्धतीने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले़
शहरातील काही मंडळी राष्ट्रवादीचे पद घेवून समाजवादी, भाजपच्या बॅनरवर झळकत आहेत़ त्यांनी पक्षाचा स्वत:च्या स्वार्थापुरता वापर करू नये, असेदेखील कदम म्हणाले़ दरम्यान, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल आंदोलनासंदर्भात मार्गदर्शन केले़ माजी आ़ शंकरअण्णा धोंडगे यांच्यासह उपस्थितांनी आपले विचार मांडले़
पदाधिकाºयांत खदखद
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी पदाधिकाºयांची बैठक घेतली़ यावेळी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या़ राज्यस्तरावर निर्णय घेताना स्थानिक परिस्थितीही लक्षात घ्या़, असे त्यांची म्हणणे होते़ यावर काही निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेतले असे स्पष्टीकरण मुंडे यांना यावेळी द्यावे लागले़