पॉलिटेक्निक, फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार, विद्यार्थ्यांत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:31 AM2021-02-18T04:31:09+5:302021-02-18T04:31:09+5:30
नांदेड - राज्यातील पॉलिटेक्निक व फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाने पॉलिटेक्निक व ...
नांदेड - राज्यातील पॉलिटेक्निक व फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाने पॉलिटेक्निक व फार्मसी डिप्लोमा परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. तसेच विद्यापीठानेही पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांवर असलेल्या परीक्षेला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. परंतु, अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. कोरोनामुळे गेले वर्षभर ऑनलाईन शिक्षणावरच भर देण्यात आला आहे. परंतु, पॉलिटेक्निक व फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे काही विषय प्रात्यक्षिक स्वरूपाचे आहेत. त्यामुळे या विषयांच्या तासिका ऑनलाईन झालेल्या नाहीत. त्यामुळे परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांकडून अशाप्रकारचा प्रात्यक्षिक अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासोबतच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करण्याचे आव्हान प्राध्यापकांसमोर आहे.
चौकट- कोरोनामुळे ऑनलाईन वर्ग घेण्यात आले असले तरी काही अवघड विषयांचे समाधान ऑनलाईन वर्गात झाले नाही. तसेच प्रात्याक्षिक विषयांचे वर्गही झाले नाहीत. त्यामुळे आता अवघ्या दोन महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे व परीक्षेची तयारी करणे, हे आव्हान आहे. - आकाश कवडे, पॉलिटेक्निक विद्यार्थी.
चौकट - हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी कसोटीचे असणार आहे. कारण मागील वर्षभरापासून कोरोनामुळे कॉलेज होऊ शकले नाही. त्यातच ऑनलाईन शिकवणीत अनेक विषय शिकवायचे राहून गेले आहेत. त्यात आता परीक्षा तोंडावर आल्या आहेत. - शीला कांबळे, पॉलिटेक्निक विद्यार्थिनी.
चौकट- गेेले काही महिने ऑनलाईन वर्ग घेण्यात आले असले, तरी आता उरलेल्या दोन महिन्यात संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार, हा प्रश्न आहे. त्याशिवाय परीक्षा कशी देणार. हे वर्षच गोंधळाचे गेले आहे. त्यामुळे काय करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. - समता भिसे, फार्मसी विद्यार्थिनी.
चौकट- एकतर अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यातच दोन महिन्यांवर परीक्षा आल्या आहेत. ऑनलाईनवर वर्ग झाले असले तरी प्रात्याक्षिक झालेले नाही. त्यामुळे विषय अर्धवट आहेत. जोपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण होत नाही, तोपर्यंत परीक्षा घेऊ नयेत. - दीक्षा वाघमारे, फार्मसी विद्यार्थिनी
चौकट- परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, दोन महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत करावी लागणार आहे. त्यासाठी जादा तासिका घ्यावा लागणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार नसला तरी गोंधळून न जाता त्यांनी अभ्यास करावा. - सुनील कदम, प्राचार्य, श्री संभाजी कॉलेज ऑफ फार्मसी, नांदेड
चौकट- पॉलिटेक्निक महाविद्यालयांनी ऑनलाईन शिकवणीद्वारे अभ्यासक्रम जवळपास पूर्ण केला आहे. वेळोवेळी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेला न घाबरता सामोरे गेले पाहिजे. अभ्यासात सातत्य ठेवून आलेल्या अडचणी प्राध्यापकांसोबत संवाद साधून सोडविल्या पाहिजेत. - प्राचार्य, ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालय, विष्णूपुरी, नांदेड.