उमरीत बसस्थानकाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:44 AM2020-12-11T04:44:32+5:302020-12-11T04:44:32+5:30

बसस्थानक बनले दारुड्यांचा अड्डा उमरी : कोरोना साथ रोगाच्या महामारीनंतर बससेवा नियमितपणे सुरू झाली व प्रवासी संख्या वाढली ...

Poor condition of Umrit bus stand | उमरीत बसस्थानकाची दुरवस्था

उमरीत बसस्थानकाची दुरवस्था

Next

बसस्थानक बनले दारुड्यांचा अड्डा

उमरी : कोरोना साथ रोगाच्या महामारीनंतर बससेवा नियमितपणे सुरू झाली व प्रवासी संख्या वाढली असली तरी उमरी बसस्थानकात प्रसाधनगृहे, आसन व्यवस्था, पाणी आदी अनेक सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे.

उमरी बसस्थानक हे शहराच्या मध्यवर्ती भागात असून कोरोना महामारीनंतर आता भोकर-उमरी-नरसी, भोकर-उमरी-नांदेड, बिलोली-कुंडलवाडी-धर्माबाद-उमरी अशी नियमित बससेवा सुरू झालेली आहे. याबरोबरच तेलंगणा राज्यात जाण्यासाठी तानुर मार्गे म्हैसा या बसच्या दररोज दोन फेऱ्या होतात. या भागातील लोकल रेल्वे गाड्या अद्याप पूर्ववत सुरू झालेल्या नाहीत. केवळ देवगिरी एक्स्प्रेस व अजंता एक्स्प्रेस या दोन जलद विशेष रेल्वे गाड्या वगळता इतर अनेक रेल्वेगाड्या बंद असल्याने बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रवासासाठी नागरिकांना बसशिवाय अन्य कुठलाही पर्याय नाही. कोरोना महामारीनंतर बससेवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल जमा होण्यास मदत झाली आहे. नववी ते बारावीचे वर्गही सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची दररोज ये-जा सुरू झाली आहे. बसस्थानकात असंख्य प्रवासी वयोवृद्ध, महिला, विद्यार्थी बसची वाट पाहत बसलेले असतात. मात्र, बसस्थानकात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जागोजागी पान, तंबाखूच्या पिचकाऱ्या दिसून येतात. बसस्थानकात नियमितपणे साफसफाई करण्यासाठी कुठलीच उपायोजना केलेली नाही. येथे प्रवाशांना बसायला पुरेशी आसन व्यवस्था नाही. पिण्यासाठी पाणी नाही. प्रसाधनगृहे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. प्रसाधनगृह इमारतीचे बांधकाम गेल्या वर्षभरापासून अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे महिला, पुरुषांना उघड्यावरच विधी उरकावा लागतो. बसस्थानकाच्या एका बाजूला पत्त्यांचा जुगार तर बसस्थानकामध्ये दारुड्यांची रेलचेल दिसून येते. काहीजण बसस्थानकात बसूनच दारू ढोसत असतात. रात्री तर काही टपोरी तरुणांचे टोळके या ठिकाणी नेहमीच बसलेले असते. एक प्रकारे त्यांच्यासाठी हा एक जुगार खेळण्यासाठी व दारू पिण्यासाठी सुरक्षित अड्डा बनलेला आहे. बसस्थानकाच्या सुरक्षेसाठी रात्री येथे वॉचमनची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे पंखे, विजेचे दिवे आदी इलेक्ट्रिकचे किमती साहित्य चोरीला गेले. याबाबत पोलिसांनी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याची गरज आहे.

कोट

बसस्थानकात बसून दारू पिणाऱ्यांना आपण मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते वाद घालून अंगावर येत आहेत. तसेच बसस्थानक आवारात विनापरवाना ऑटो रिक्षा व इतर वाहनांची पार्किंग करण्यात येत आहे. यासंदर्भात आपण उमरी पोलीस स्टेशनला माहिती दिलेली आहे.

-मारुती चंद्रपाड, नियंत्रक, बस स्थानक उमरी, राज्य परिवहन महामंडळ.

Web Title: Poor condition of Umrit bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.