नांदेड जिल्ह्यात आता रेशनकार्डसाठीही पोर्टेबिलीटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:03 AM2018-09-04T00:03:50+5:302018-09-04T00:05:52+5:30
मोबाईलचा क्रमांक न बदलता ज्याप्रमाणे कंपनी बदलता येते. म्हणजेच, पोर्टेबिलीटी करता येते़ त्याचप्रमाणे यापुढे इतर कोणत्याही जिल्ह्यातील अथवा राज्यातील रेशनकार्ड जिल्ह्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात चालू शकणार आहे़ नांदेड जिल्ह्यात हा पथदर्शी प्रकल्प लवकर राबविण्यात येणार असून पुरवठा विभागाच्या वतीने याची तयारी सुरु आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मोबाईलचा क्रमांक न बदलता ज्याप्रमाणे कंपनी बदलता येते. म्हणजेच, पोर्टेबिलीटी करता येते़ त्याचप्रमाणे यापुढे इतर कोणत्याही जिल्ह्यातील अथवा राज्यातील रेशनकार्ड जिल्ह्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात चालू शकणार आहे़ नांदेड जिल्ह्यात हा पथदर्शी प्रकल्प लवकर राबविण्यात येणार असून पुरवठा विभागाच्या वतीने याची तयारी सुरु आहे़
एखाद्या राज्यातून अथवा शहरातून दुसरीकडे गेल्यानंतर आधीचे रेशनकार्ड रद्द करुन ते नव्या ठिकाणी काढावे लागते़ मात्र रेशनकार्ड न बदलता दुसऱ्या जिल्ह्यात अथवा राज्यात ते चालावे यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सार्वजनिक वितरण प्रणाली एकीकृत वितरण व्यवस्थेवर (आयएम-पीडीएस) मागील काही दिवसांपासून काम सुरु होते़ केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी काही दिवसांपूर्वीच अशा प्रकारची योजना लवकरच सुरु करण्याची घोषणा करीत या योजनेसाठी १२७ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे जाहीर केले होते़ या पोर्टेबिलीटी शिवाय अतिरिक्त बनावट रेशनकार्ड रद्द करण्याचेही काम या प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे़ याबरोबरच ही प्रणाली रेशनकार्डचे व्यवस्थापन, वितरण, पुरवठा व रेशन दुकानाच्या स्वयमचलनाचेही काम करणार आहे़ याशिवाय पीडीएससाठी वेब आणि मोबाईल अॅप्लिकेशनदेखील तयार करण्यात येणार असून महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये ही रेशनकार्डची पोर्टेबिलीटी लागू करण्यात येणार असल्याचे पासवान यांनी जाहीर केले होते़ दरम्यान, सुरुवात म्हणून चार राज्यांसह २२ जिल्ह्यांची या प्रायोगिक तत्त्वावरील योजनेसाठी निवड झाली आहे़ यात महाराष्ट्रातील नांदेड, मुंबई शहर, मुंबई ग्रामीण, यवतमाळ आणि चंद्रपूर तर आंध्र प्रदेशातील कृष्णा, गुंट्टुर, पश्चिम गोदावरी, कर्नुल आणि प्रकाशम्, तेलंगणा राज्यातील हैद्राबाद, नालगोंदा, खाम्म, नागारकारनुल, आदिलाबाद आणि निजामाबाद तर हरियाणा राज्यातील फरिदाबाद, गुरुग्राम, झांझर, रेवारी आणि सोनीपथ या जिल्ह्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे़ नांदेड जिल्ह्यात ही योजना राबविण्यासाठी पुरवठा विभागाकडून तयारी सुरु करण्यात आली असून पात्र रेशनकार्डधारकांनी आयएम-पीडीएस योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या स्वस्त धान्य दुकानदारशी संपर्क साधून तहसील कार्यालयात माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी केले आहे़
कोणाला मिळणार या योजनेचा लाभ...
या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डधारकाकडे उपरोक्त राज्याच्या जिल्ह्यातील रेशनचे कार्ड हवे़ याबरोबरच आधारकार्डही आवश्यक आहे़ इतर राज्यांतील रेशनकार्डधारकास आयएम-पीडीएस योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील धान्य वाटपाच्या ठरलेल्या प्रमाण व दरानुसार धान्य वितरीत करण्यात येणार आहे़