सकारात्मक विचाराने कुटुंबाने केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:13 AM2021-05-03T04:13:00+5:302021-05-03T04:13:00+5:30
वैद्यकीय उपचारांसाठी फिजिशियन डाॅ. संतोष शिंदे यांच्या सल्ल्यानुसार सर्व परिवाराने घरी राहूनच कोरोनावर तत्काळ उपचार चालू केले. यामध्ये ...
वैद्यकीय उपचारांसाठी फिजिशियन डाॅ. संतोष शिंदे यांच्या सल्ल्यानुसार सर्व परिवाराने घरी राहूनच कोरोनावर तत्काळ उपचार चालू केले. यामध्ये सर्वांची तब्येत सुधारत होती. परंतु, त्यांचा १७ वर्षांचा मुलगा विवेक चव्हाण याच्या तब्येतीमध्ये जास्त सुधारणा दिसून येत नसल्यामुळे डाॅ. शिंदे यांच्या सल्ल्यानुसार प्रयोगशाळेमध्ये काही रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या. त्या तपासण्यांमध्ये कुठलाच दोष दिसून आला नाही. त्यानंतर एच.आर.सी.टी तपासणी केली असता त्यामध्ये ११ स्कोअर आला. यामुळे खरं तर रुग्णालयात दाखल करणे गरजेचे हाेते. मात्र, विवेकला इतर कुठलेही लक्षण नसल्यामुळे व रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्ण पाहूनच मुलगा घाबरून जाऊ शकेल म्हणून चव्हाण परिवाराने पुढील वैद्यकीय उपचार घरीच करण्याचे ठरविले. यामध्ये वैद्यकीय मदत डाॅ. संतोष शिंदे, डाॅ. देवानंद सोनवणे, सुरेखा अलसटवार, विलास सावळे यांच्याकडून मिळाली, तर त्यांचे मित्र कैलास सावळे, सचिन चौधरी, संजय भोसले, शेखर नातेवार, राजकुमार इंगळे यांनी मानसिक आधार दिल्यामुळे व सकारात्मक प्रोत्साहनातून कोरोनाच्या लढाईत मोठ्या हिंमतीने विजय झाले आहेत. विवेक चव्हाण आता कोरोनातून ठणठणीत बरा झालेला आहे. चव्हाण परिवाराला कुठल्याही रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ न करता सर्वांना सकारात्मक विचारातून कोरोनावर मात करता आली.
यावेळी विजय चव्हाण यांनी सांगितले की, कोरोना या आजारावर मात करण्यासाठी कसल्याही प्रकारे न घाबरता आपल्या परिवारातील कुणालाही कोरोनाची लक्षणे दिसल्यास किंवा पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कामध्ये आल्यास यावेळी घरात न बसता आणि अंगावरच आजार काढण्यापेक्षा कुठल्याही जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन आपली आधी तपासणी करून लगेच मेडिसीन चालू करणे गरजेचे आहे. यावेळी कोरोना आजाराची प्रचंड भीती घेऊन मानसिक ताणतणाव वाढवून दोन हात करण्यापेक्षा सकारात्मक विचारातून पुढे गेले, तर कोरोनाविरुद्ध लढाईत आपण निश्चिच जिंकू शकतो.