पूर्ण लसीकरणानंतरच महाविद्यालये उघडण्याची शक्यता : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:54 PM2021-08-12T16:54:58+5:302021-08-12T17:00:13+5:30
Minister Uday Samant on College Opening : संपूर्ण राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील
नांदेड : विद्यार्थी व पालकांकडून महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात मागणी होत आहे. जोपर्यंत पूर्ण लसीकरण ( Corona Vaccination ) होत नाही, तोपर्यंत महाविद्यालये उघडण्याचा निर्णय घेणे घातक ठरू शकतो. संपूर्ण राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Udhhav Thakarey ) याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ( Uday Samant ) यांनी दिली. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ( SRT University )सिनेट सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ( Possibility of opening colleges only after complete corona vaccination: Uday Samant)
दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले मंत्री उदय सांमत यांनी शुक्रवारी कोविड योद्धा असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा गौरव केला. यावेळी आ.मोहनराव हंबर्डे, आ.बालाजीराव कल्याणकर, कुलगुरू डाॅ. उद्धव भोसले, प्र- कुलगुरू डॉ.बिसेन यांची उपस्थिती होती. यासोहळ्यानंतर मंत्री उदय सांमत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मागील सात, आठ वर्षापासून स्वारातीम विद्यापीठात अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र स्थापन करावे, या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना तसेच विद्यार्थी संघटनांनी पाठपुरावा केला होता. विद्यापीठस्तरावर प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर राज्य शासनाकडे हा विषय प्रलंबीत होता. मात्र, येत्या महिनाभरात हा विषय मार्गी लागणार असल्याचे मंत्री उदय सांमत यांनी सांगितले.
हेही वाचा - थरारक ! नांदेडमध्ये भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यावर गोळीबार
स्वारातीम विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, व संबंधित जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे. त्यानंतर राज्य शासनाकडून याबाबत विचार होईल. कदाचित या ठिकाणचा पॅटर्न राज्यभर राबविला जाईल. विशेषता: उपलब्ध होणाऱ्या लसींच्या संख्येनुसार ३० टक्के लसीकरण हे महाविद्यालयांचे व्हावे,असेही सांमत यांनी सूचित केले.
प्राध्यापक भरती होणार
हाय पॉवर कमिटीने जाहीर केलेली ३ हजार ७४ पदांच्या भरतीला आम्ही सुरूवात करत असून विद्यापीठाच्या ६२९ प्राध्यापकांच्या पदांची भरती सुरू करण्यात येणार असून १२१ ग्रंथपाल पदाची भरती करण्यात येणार आहे. माझ्याकडून फाईल सामान्य प्रशासनाला गेली असून त्यांच्याकडून ही फाईल फायनान्सच्या प्रधान सचिवांकडे गेली आहे. येत्या दोन, तीन दिवसात ती मंजूर होईल, असे उच्च व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.