नांदेडच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:49 AM2021-02-20T04:49:45+5:302021-02-20T04:49:45+5:30
गेल्या दहा महिन्यांपासून घरगुती व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांसोबतच आता पाणीपुरवठा व पथदिव्यांची थकबाकी वसूल करण्याकडे महावितरणने मोर्चा वळविला ...
गेल्या दहा महिन्यांपासून घरगुती व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांसोबतच आता पाणीपुरवठा व पथदिव्यांची थकबाकी वसूल करण्याकडे महावितरणने मोर्चा वळविला आहे.
कोरोना काळातील स्थिती लक्षात घेऊन महावितरणने एप्रिल २०२० पासून गेल्या दहा महिन्यांत एकाही वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला नव्हता. मात्र, महावितरणच्या थकबाकीचा डोंगर वाढतच चालला असून वीज विकत घेण्यासाठी महावितरणला वित्तीय संस्थांकडून कर्ज काढण्याची वेळ आली आहे. महावितरणची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन महावितरण प्रशासनाने आता थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
महापालिकेस पाणी पुरवठा व पथदिव्यांची थकबाकी भरण्याकरिता महावितरणने १२ व २१ जानेवारी रोजी पत्राद्वारे थकबाकी न भरल्यास वीज खंडित करण्याची सूचना दिली आहे. मात्र, अद्याप थकीत रकमेचा भरणा न केल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई आता दोन दिवसांत करू, असा इशारा महापालिकेला दिला आहे. महापालिकेकडे लघु दाब वर्गवारीतील पथदिव्यांचे ६६४ वीज कनेक्शन आहेत. या वीज जोडण्यांकडे १० कोटी ५० लाख रुपये थकबाकी आहे. तर लघु दाब वर्गवारीतील पाणी पुरवठा योजनांचे १५९ वीज कनेक्शन असून त्यांच्याकडे ८५ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर उच्च दाब वर्गवारीतील पाणी पुरवठ्याच्या १५ वीज कनेक्शनकडे ४६ कोटी ९१ लाख रुपये थकबाकी आहे.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता वीज बिलाची ही मोठी रक्कम महापालिका कशी उभारणार, हा प्रश्नच आहे.