प्रकाश आंबेडकर म्हणे... 'आमचं सरकार आल्यास जुन्या नोटा बदलून देणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 11:55 PM2019-04-03T23:55:09+5:302019-04-03T23:56:41+5:30
नोटाबंदीमुळे देशातील व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी त्यामुळेच आत्महत्या केल्या असून इतर व्यापाऱ्यांना धाड टाकण्याच्या धमक्या सरकार देत आहे.
नांदेड : नोटाबंदीमुळे देशातील व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी त्यामुळेच आत्महत्या केल्या असून इतर व्यापाऱ्यांना धाड टाकण्याच्या धमक्या सरकार देत आहे. अशा स्थितीत वंचित आघाडीची सत्ता आल्यास व्यापा-यांकडील जुन्या नोटा बदलून देऊ, असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. देशाला चौकीदाराची नव्हे तर एका अभ्यासू पंतप्रधानाची गरज असल्याचेही ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ बुधवारी अॅड. आंबेडकर यांच्या किनवट आणि हदगाव येथे प्रचारसभा झाल्या. ते म्हणाले की, सरकारने नोटाबंदी केल्याने देशातील व्यापार, उद्योग ठप्प झाला आहे. काही नोटा बदलून मिळाल्या असल्या तरी अनेक व्यापा-यांकडे मोठ्या प्रमाणात जुन्या नोटांचा साठा आहे. या नोटा आम्ही आमची सत्ता आल्यास बदलून देऊ. मात्र चोरांचे सरकार पुन्हा येणार नाही, याची खबरदारी मतदारांनी घ्यायला हवी. देशाचा पंतप्रधान हा लोकांना उत्तर देणारा असावा. मात्र सध्याचे पंतप्रधान त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देता केवळ मन की बात थोपतात. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातीच्या विवाहाला नरेंद्र मोदी उपस्थित होते. तेथे काही मोस्ट वाँटेड असलेल्या मंडळींचीही उपस्थिती होती.
आमंत्रण नसताना अशा लग्नाला जाणे पंतप्रधान म्हणून टाळायला हवे होते असे ते म्हणाले. राज्य घटनेप्रमाणे मतदार हा या देशाचा राजा, तर लोकप्रतिनिधी सेवक आहेत. मात्र भाजपा सरकार पंतप्रधानांना देशाचा राजा करू पाहत असल्याचे सांगत यामुळे देशातील लोकशाही संकटात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. ही निवडणूक वंचित समाजाच्या अस्तित्वाचा लढा आहे. या लढ्यात आम्ही आमच्या हक्कासह जिंकून दाखवू असे सांगत न्याय व्यवस्थेमध्येही वंचितांना सन्मान मिळायला पाहिजे, असे ते म्हणाले.