प्रकाश आंबेडकरांनी धनगर आरक्षणाबाबतची भुमिका स्पष्ट करावी; धनगर विवेक जागृती अभियानाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 04:16 PM2019-01-16T16:16:10+5:302019-01-16T16:19:52+5:30
नांदेड : मागील सत्तर वर्षापासून काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धनगरांना केवळ आरक्षणाचे अमिष दाखविले आणि त्यांच्या मताचे राजकारण केले. त्यानंतर ...
नांदेड : मागील सत्तर वर्षापासून काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धनगरांना केवळ आरक्षणाचे अमिष दाखविले आणि त्यांच्या मताचे राजकारण केले. त्यानंतर आलेल्या भाजप सरकारनेही मागील साडेचार वर्षात तेच केले. आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर देखील धनगरांच्या आक्षणाच्या मुद्यावरून समाजाला गोंधळात टाकत आहेत. त्यांनी एक विचारवंत नेते आणि वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख या नात्याने धनगरांच्या आरक्षणाचे राजकारण न करता आपली भुमिका स्पष्ट करावी, असे मत धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी मांडले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नांदेड येथे १७ जानेवारी रोजी जाहिर सभा आयोजित केली आहे. या सभेला अॅड.प्रकाश आंबेडकर हे संबोधित करत असून त्या पार्श्वभूमिवर विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण डॉ. बाबासाहेबांनीच दिले आहे. परंतु राजकिय मंडळींनी ते मिळू दिले नाही. काँगे्रस- राष्ट्रवादीने 60 वर्षे फसविले. त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारनेही धनगरांना साडेचार वर्षे आरक्षणाचे गाजर दाखवून फसविले. आता मात्र धनगर समाजाला अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय पर्याय नाही. डॉ. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून धनगरांना दिलेले आरक्षण त्यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर लागू करतील, तसेच धनगर आणि धनगड एकच आहेत, असे धनगर समाजाचे आणि वंचित आघाडीतील धनगर कार्यकर्त्यांचे मत आहे, त्याच्याशी आंबेडकर सहमत आहेत काय, प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षण, सवर्ण आरक्षणावर ठोस भुमिका घेतात. मात्र धनगर आरक्षणावरती भुमिका का घेत नाहीत, असा सवालही ढोणे यांनी उपस्थित केला आहे.