प्रयागराज दुर्घटनेतील मृताचे घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:56 AM2019-02-01T00:56:41+5:302019-02-01T00:58:37+5:30
नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे बुधवारी मधयरात्रीनंतर चोरट्यांनी दोन घरे फोडून रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यासह लाखोंचा ऐवज लांबविला़ घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांनी पाहणी केली़ पण चोरांचा मागोवा लागला नाही़
गडगा : नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे बुधवारी मधयरात्रीनंतर चोरट्यांनी दोन घरे फोडून रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यासह लाखोंचा ऐवज लांबविला़ घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांनी पाहणी केली़ पण चोरांचा मागोवा लागला नाही़
उत्तरप्रदेश प्रयागराज बोट दुर्घटनेत मरण पावलेल्या कोलंबी ता़ नायगाव येथील रमेश दिगंबर बैस यांच्या घरातकर्ता पुरुष राहिला नाही़ दरम्यान, घरातील महिला नांदेडला मुला-मुलीकडे गेल्या होत्या़ त्यामुळे घर कुलूपबंद होते़, याची संधी साधून चोरट्यांनी ३० जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर बैस यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळविला़ घरातील कपाट व तीन पेट्या फोडून गंठन, नेकलेस, पाटल्या, अंगठी, झुंबर, ब्रासलेट असे १६ तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख सव्वा लाख रुपये असा एकूण ६ लाख १० हजारांचा ऐवज लांबविला़
त्यानंतर चोरट्यांनी शंकरराव चव्हाण विद्यालयाचे अध्यक्ष उद्धवराव रामराव बैस यांच्या घरात बाहेर रस्त्याला शेजारी असलेली शिडी लावून घरात प्रवेश केला़ तेथे भींतीवर बसवलेल्या आलमारी (लाकडी) मध्ये असलेले रोख ५० हजार रुपये व अंगणात ठेवलेली एम़एच़२६- बी़जी़ ६३६५ क्रमांकाची मोटरसायकल घेऊन चोरटे पसार झाले़ नंतर गावाच्या उत्तर दिशेला मुख्य रस्त्यालगत असलेल्या सेवानिवृत्त शिक्षक एचक़े ़ बैस यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करीत असताना बैस जागे झाले़ त्यांनी आरडाओरड करताच चोरट्यांनी धूम ठोकली़
घटनेनंतर घटनास्थळी पो़उ़नि़ शिवराज धडवे, जमादार लक्ष्मण पाटील यांनी भेट दिली़ त्यानंतर श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले़ घटनास्थळी श्वानपथक आले़ चोरीच्या ठिकाणी आल्यानंतर श्वान तेथेच घुटमळले़ या प्रकरणी उशिरापर्यंत नायगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली नव्हती़
निष्ठूर चोर, गाफील यंत्रणा
उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथे बोट दुर्घटनेत नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील बैस कुटुंबातील दिगांबर रामराव बैस (वडील), रमेश दिगांबर बैस (मुलगा), बैस कुटुंबियाचे जावई डॉ़देवीदास नारायण कच्छवे यांच्यासह सात-आठ जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना १० डिसेंबर रोजी घडली होती़ या घटनेने बैस कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला़ यात आता कर्ता पुरुषच राहिला नाही़ त्यानंतर घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मयत डॉ़देवीदास कच्छवे यांचे नायगाव बाजार येथील घर चोरट्यांनी १४ डिसेंबर रोजी साफ केले़ त्या चोरीच्या घटनेत २० तोळे सोने, ६ तोळे चांदी चोरट्यांनी लंपास केली़ या चोरीचा तपास लावण्यात अद्यापही पोलिस यंत्रणेला यश आले नाही़ तेच पुन्हा एकदा बैस कुटुंबातील मयत रमेश बैस यांचे घर बुधवारी रात्री साफ केले़