मान्सून पूर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:19 AM2021-05-21T04:19:18+5:302021-05-21T04:19:18+5:30

न जिल्ह्यात गोदावरी नदी आणि इतर लहान-मोठ्या नद्या लक्षात घेता जवळपास ३३७ गावांना पुरांचा धोका हा उद्भवू शकतो. जिल्ह्यात ...

Pre-monsoon works should be completed on time by the system: Collector | मान्सून पूर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत : जिल्हाधिकारी

मान्सून पूर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत : जिल्हाधिकारी

Next

न जिल्ह्यात गोदावरी नदी आणि इतर लहान-मोठ्या नद्या लक्षात घेता जवळपास ३३७ गावांना पुरांचा धोका हा उद्भवू शकतो. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या-त्या भागांतून सुरक्षिततेच्या उपाययोजना योग्य पद्धतीने जिल्हा प्रशासनाला हाताळता याव्यात यादृष्टीने सर्व यंत्रणानी दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. मान्सूनच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध खरेदी आपत्तींना तोंड देण्यासाठी आणि सावधगिरीच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर म्हणाले, जिल्ह्यात ३३७ गावे पूरग्रस्त आहेत या गावात रंगीत तालीम घ्याव्यात. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांची आवश्यक साहित्यांची करावी. २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना करून कक्षातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक अद्यावत करावेत. आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहतील यांचे नियोजन करावे. आदिवासी व ग्रामीण भागात सर्पदंशासह इतर आजारांवरील उपचार स्थानिक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातच करावेत. रुग्णाला औषधोपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासू नये. आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी आरोग्य पथकांची नियुक्ती करावी. पावसाळयात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी, रक्तसाठा इतर अनुषंगिक साहित्य उपलब्ध करावीत. ब्लीचिंग पावडरची साठवणुक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इटनकर आरोग्य विभागाला दिले.

गावांना धोका होऊ नये यादृष्टीने पाझर तलावाची दुरुस्ती करून गाळ काढावा. शहरातील धोकादायक इमारतींना नोटीस देऊन नियमांनुसार कारवाई करावी. पूर परिस्थितीत नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. सुरक्षितस्थळे निश्चित करावीत तसेच महावितरण, जिल्हा पुरवठा कार्यालय, शिक्षण विभाग, पशुसंवर्धण विभाग, कृषि विभाग यांनाही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या.

पाटबंधारे विभागाने गोदावरी व इतर नदीच्या पाणी पातळीचा धोका, इशारा पातळीबाबत उपाययोजना करताना सर्व विभागांशी समन्वय ठेवून धरणनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तालुकास्‍तरावर मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक घेऊन पूर परिस्थिती प्रतिबंधक कामे मान्सूनपूर्वी करावीत. आपत्कालिन नियंत्रण कक्षातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोबाईल संपर्क अद्ययावत करावीत. वाहन व्यवस्था सुस्थितीत ठेवावी. वीजपातामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी जनजागृती आणि बचावकार्याचे प्रशिक्षण पूर्ण करावेत. नगरपालिका प्रशासनाने शहरातील नाली साफसफाईचे कामकाज युद्धपातळीवर करावेत. आपत्ती निवारणाची कामे सक्षमपणे पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी यावेळी दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली.

या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी, अनुराधा ढालकरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण यांच्यासह परिवहन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महानगरपालिका, आरोग्य, कृषी, महसूल विभाग आदी विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष तर तालुकास्तरावरील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मृद व जलसंधारण, विद्युत, पोलीस, अग्निशमन, शिक्षण, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

Web Title: Pre-monsoon works should be completed on time by the system: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.