महालसीकरण अभियानात दोन लाख नागरिकांना लस देण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:18 AM2021-04-08T04:18:21+5:302021-04-08T04:18:21+5:30

अनुराग पोवळे कोरोनाला स्वत:पासून दूर ठेवण्यासाठी लस घेणे महत्त्वाचे असून, लसीकरणानंतर कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याचे अनेक ठिकाणी स्पष्ट झाले ...

Preparations to vaccinate two lakh citizens in Mahalsikaran Abhiyan | महालसीकरण अभियानात दोन लाख नागरिकांना लस देण्याची तयारी

महालसीकरण अभियानात दोन लाख नागरिकांना लस देण्याची तयारी

Next

अनुराग पोवळे

कोरोनाला स्वत:पासून दूर ठेवण्यासाठी लस घेणे महत्त्वाचे असून, लसीकरणानंतर कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याचे अनेक ठिकाणी स्पष्ट झाले आहे. त्याच अनुषंगाने महापालिकेने शहरातील दोन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी महालसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. याच अभियानाच्या दृष्टीने शहरातील व्यापारी संघटना, ऑटो संघटना, किराणा दुकान संघटना, मंगल कार्यालय चालक आदींची महापालिकेत बुधवारी बैठक घेण्यात आली.

शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उपचार सुविधांसह लसीकरणाचाही वेग वाढविण्याची गरज आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात पूर्वी असलेल्या चार लसीकरण केंद्रात सहा केंद्राची भर घालत दहा ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था केली. त्यात व्यापारी संघटना व इतर संघटनांनी मागणी केल्यास त्या त्या भागात लसीकरणाचे स्वतंत्र कॅम्पही लावले जाणार आहेत.

शहरात ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे जवळपास दोन लाख नागरिक आहेत. या सर्वांना एप्रिलअखेरपर्यंत लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आजघडीला शहरात जवळपास एक हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. महापालिकेची प्रतिदिन पाच हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. त्यात भर टाकून ही क्षमता दहा हजारांपर्यंत नेली जाणार आहे. लसीकरणाबाबत नागरिकांनी मनातील भीती दूर करण्याची गरज असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सांगितले.

महालसीकरण अभियानाच्या अनुषंगाने महापालिकेत बुधवारी शहरातील व्यापारी, ऑटोचालक, सराफा असोसिएशन, भाजीपाला विक्रेता संघटना, मेडिकल असोसिएशन, मंगल कार्यालय चालक आदींची बैठक घेण्यात आली. त्यात लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्याचवेळी ब्रेक द चेन अंतर्गत ज्या ज्या घटकांना दुकान उघडण्याची परवानगी त्यांना लस घेणे बंधनकारक आहे. ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि ४५ पेक्षा वय कमी असलेल्यांना कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे गरजेचे आहे. १० एप्रिलनंतर महापालिकेच्या वतीने व्यापाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. दुकानातील एखाद्या कामगाराकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसेल तर त्या कामगाराला एक हजार रुपये दंड आणि दुकानाला दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. ऑटोचालकांनाही हाच नियम लावण्यात येणार आहे. कोरोना लसीकरण तसेच चाचणीचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक केले आहे, अन्यथा दंड आकारला जाईल, असेही स्पष्ट केले. या बैठकीला आयुक्त डॉ. लहाने यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख अजितपालसिंग संधू, उपायुक्त शुभम क्यातमवार, डॉ. बद्रिउद्दीन यांच्यासह व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

आजपासून विशेष मोहीम...

महापालिकेच्या वतीने ८ एप्रिलपासून विशिष्ट व्यक्तीसाठी १५ एप्रिलपर्यंत विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात न्यायिक विभाग आणि वकिलांसाठी जिल्हा न्यायालय परिसरात लस दिली जाणार आहे. व्यापारी, वैद्यकीय कर्मचारी, ऑटोचालक, ट्रॅव्हल्सचालक, एसटी महामंडळ चालक यांच्यासाठी गुरुद्वारा परिसरातील दशमेश रुग्णालयात, हॉटेल कामगार, डिलिव्हरी बॉय, होम डिलिव्हरी स्टाफ यांना शिवाजीनगर मनपा रुग्णालयात, शालेय शिक्षक, कर्मचारी, महाविद्यालय शिक्षक, कर्मचारी, शासकीय व खासगी कार्यालयातील कर्मचारी यांना जंगमवाडी मनपा रुग्णालय, कामगार, फेरीवाले, भाजीपाला व अळविक्रेते यांना मनपा हैदरबाग रुग्णालय आणि माध्यम कर्मचारी तसेच पत्रकारांना पौर्णिमानगर येथील मनपा रुग्णालयात कोरोना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

लातूरहून आज आणखी लस मिळणार..

महापालिकेला गुरुवारी आणखी लस मिळणार आहे. या लस लातूरहून उपलब्ध होतील, असे मनपा आयुक्त डॉ. लहाने यांनी सांगितले. महापालिकेकडे लस उपलब्ध असल्या तरी आगामी काळातील विशेष मोहीम, अभियानासाठी लस कमी पडणार नाहीत, याबाबत दक्षता घेतली जात असल्याचे आयुक्त डॉ. लहाने यांनी सांगितले.

Web Title: Preparations to vaccinate two lakh citizens in Mahalsikaran Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.