देगलूरमध्ये राहूनच केली स्पर्धा परीक्षेची तयारी; चार जणांची जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 18:21 IST2023-12-12T18:20:37+5:302023-12-12T18:21:59+5:30
खडतर प्रयत्न केल्यास परिस्थितीदेखील बदलते हेच या चारही विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.

देगलूरमध्ये राहूनच केली स्पर्धा परीक्षेची तयारी; चार जणांची जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी
- शब्बीर शेख
देगलूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत देगलूरच्या ४ मुलांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. तिन जणांची कर सहाय्यक पदी तर अन्य एकाची सहाय्यक सहकार अधिकारी या पदावर निवड झाली आहे. विशेष म्हणजे मध्यमवर्गीय व शेतकरी कुटुंबातील या चारही विद्यार्थ्यांनी जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी घातली आहे. खडतर प्रयत्न केल्यास परिस्थितीदेखील बदलते हेच या चारही विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.
हल्ली शिक्षण क्षेत्रामध्ये वाढलेली स्पर्धा पाहता अनेक पालक आपल्या पाल्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मुंबई- पुणे सारख्या मोठ्या शहरात पाठविण्यासाठी प्राधान्य देतात. मात्र देगलूर सारख्या ग्रामीण भागात राहूनही मध्यमवर्गीय व शेतकरी कुटुंबातील या चार विद्यार्थ्यांनी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका केंद्र येथे नियमित स्पर्धा परीक्षेची तयारी केली. खडतर प्रयत्न, जिद्द बाळगल्यास अशक्य असे काहीच नाही नेमकं हेच या चार मुलांनी सिद्ध करून दाखवले आहे.
या पदावर झाली निवड
देगलूर शहरातील सचिन मारोतीराव कडलवार याने सहकार विभागाच्या परीक्षेत एन. टी. (ब) प्रवर्गातून राज्यात प्रथम स्थान मिळविले आहे. त्याची सहकार विभागात सहाय्यक सहकार अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. तर श्याम मलकन्ना भंडरवार, नागेश यल्लप्पा निम्मलवार आणि राहुल शंकरराव गुडलावार यांची कर सहाय्यक पदासाठी निवड झाली आहे. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही निराश न होता या चारही जणांनी मिळविलेले यश देगलूर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
शहरात राहूनच केली तयारी
देगलूरचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात देगलूर सारख्या ग्रामीण भागातही गरीब व होतकरू मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या कार्यकाळात नगर विकास विभागा कडून 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. मागील अडीच वर्षांपूर्वी नगर परिषदेच्या माध्यमातून अत्याधुनिक सोयी सुविधा असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका येथील होतकरू विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे. तर माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार यांच्यासह अनेकांनी येथील विद्यार्थ्यांना लागणारी आवश्यक पुस्तके भेट स्वरूपात देऊन ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना एक प्रकारे प्रोत्साहन देण्याचे काम केले.
गरिबांची मुले स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुणे सारख्या ठिकाणी जाऊ शकत नसल्याने त्यांच्यासाठी देगलूर येथेच अभ्यासिका केंद्र सुरू करावे यासाठी पुढाकार घेऊन नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका सुरू केली. आज या चारही विद्यार्थ्यांचे यश पाहता निश्चितच मला खूप आनंद झाला असून माझ्या कामाचे सार्थक झाले आहे.
- मोगलाजी शिरशेटवार, माजी नगराध्यक्ष, देगलूर