वीज ग्राहकांना मिळणार प्रिपेड मीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:48 AM2017-07-19T00:48:46+5:302017-07-19T00:51:26+5:30
नांदेड: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून ग्राहकांना प्रिपेड सुविधा देण्यात येणार आहे़ त्यासाठी नांदेड परिमंडळाला पुढील काही दिवसांत ९ हजार प्रिपेड मीटर उपलब्ध होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून ग्राहकांना प्रिपेड सुविधा देण्यात येणार आहे़ त्यासाठी नांदेड परिमंडळाला पुढील काही दिवसांत ९ हजार प्रिपेड मीटर उपलब्ध होणार असल्याची माहिती नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांनी पत्रपरिषदेत दिली़
नांदेड परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ग्राहक, वीजचोरी, वीजगळती, दुरूस्ती तसेच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आदी कामासंदर्भात मुख्य अभियंता पाटोळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़
ग्राहकांना सेवा सुलभ व्हावी म्हणून मोबाईल अॅप, आनलाईन बिलिंग, तक्रारी आदींची सुविधा उपबल्ध करून दिली आहे़ यापेक्षाही एक पाऊल पुढे टाकत आगामी काळात प्रिपेड मीटरद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार असल्याचे पाटोळे यांनी सांगितले़ ते म्हणाले, ग्राहकांना प्रिपेड मीटर दिले जाईल़ यामध्ये जेवढ्या रकमेचे रिचार्ज असेल तेवढा वीज वापर ग्राहक करू शकतील, त्याचबरोबर रिचार्ज संपण्यापूर्वी सूचनादेखील मिळेल़ रिडींगच्या तक्रारी कमी होतील तसेच ग्राहकांकडून विजेची पर्यायाने त्यांची आर्थिक बचत होईल, असा विश्वास मुख्य अभियंता पाटोळे यांनी व्यक्त केला़
दरम्यान, वीज रिडींग घेण्यासंदर्भात ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन नांदेड परिमंडळाच्या वतीने मीटर रीडिंग एजन्सीने योग्य रीडिंग घेतले आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात क्रॉसचेक रीडिंग मोहीम राबविण्यात येत असल्याचे पाटोळे यांनी सांगितले़ यामध्ये दोषी आढळून आलेल्या रीडिंग एजन्सीवर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले़
महावितरणने पावसाळापूर्व कामे केली आहेत़ परंतु, इन्सुलेटर फुटून, झाड्याच्या फांद्या पडून तसेच शहरातील होर्डिंग्ज लाईनवर पडल्याने शहरात पाऊस सुरू असताना वीजपुरवठा खंडित होत आहे़ त्यामुळे होर्डिंग्ज लावताना वीजतारेपासून दूर लावावे, असे आवाहन पाटोळे यांनी केले़
दरम्यान, नांदेडला शासनाकडून मिळालेल्या १०६ कोटी रूपयांतून कृषी पंपाच्या ऊर्जीकरणाचे काम करण्यात आले़ यानंतर मिळालेल्या ६० कोटी रूपयांचा वापरदेखील कृषीपंपासाठी करण्यात आला़
येणाऱ्या काळात गावठाण आणि शेतातील वीज वेगवेगळ्या फिडरवरून दिली जाणार आहे़ त्यामुळे गावामध्ये २४ तास वीजपुरवठा होईल, असेही त्यांनी सांगितले़ सध्या नांदेड परिमंडळात एकूण १० लाख १४ हजार ७७२ वीजग्राहक आहेत़ यामध्ये घरगुती वापर करणारे ६ लाख ५५ हजार ५५३, वाणिज्यिक ग्राहक-४८ हजार ६६२ तर ११ हजार ८० औद्योगिक ग्राहक आहेत़