नांदेड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांत साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:32 AM2019-06-04T00:32:11+5:302019-06-04T00:33:51+5:30
जिल्ह्यात अनेक नद्यांचे जाळे पसरलेले असून, तब्बल १५६ गावे नदीकाठी असल्याने संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. नदीकाठच्या सर्व गावांमध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.
नांदेड : जिल्ह्यात अनेक नद्यांचे जाळे पसरलेले असून, तब्बल १५६ गावे नदीकाठी असल्याने संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. नदीकाठच्या सर्व गावांमध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांतून नद्या जातात. त्यामुळेच पावसाळ्यात नदीकाठच्या काही गावांना धोका होण्याची शक्यता असते. या अनुषंगाने प्रशासनाने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. नांदेड तालुक्यात गोदावरी, आसना आणि सरगावनाला या नदीकाठी आठ गावे आहेत. तर किनवट तालुक्यात पैनगंगा, किनवट-नाला, वझरा नाला, इस्लापूर नाला, मारेगाव नाला आणि कमठाळा नाला आहे. या तालुक्यातील १८ गावे नदीकाठी आहेत. माहूर तालुक्यातून पैनगंगा, गोंडवडसा नाला जातो. या तालुक्यातील ५ गावे नदीकाठावर आहेत. हदगाव तालुक्यातून पैनगंगा, कयाधूसह कारवाड नदी जाते. या तालुक्यातीलही ५ गावे नदीकाठावर आहेत. भोकर आणि उमरी तालुक्यातून गोदावरी वाहते. यात उमरी तालुक्यातील १३ गावे नदीकाठावर आहेत. देगलूर तालुक्यातून मांजरा आणि लेंडी वाहते. या तालुक्यातील १८ गावे नदीकाठावर आहेत. कंधार आणि लोहा तालुक्यातून गोदावरी आणि मन्याड या नद्या वाहतात. कंधार तालुक्यातील १५ तर लोहा तालुक्यातील १२ गावे नदी काठावर आहेत. मुखेड तालुक्यातूनही मन्याड जाते. या तालुक्यातील ८ गावे नदीकाठावर असून, बिलोली तालुक्यातून मन्याडसह मांजरा आणि गोदावरी वाहते.
या तालुक्यातील तब्बल २८ गावे नदीकाठी आहेत. या बरोबरच नायगाव ११, धर्माबाद ६, अर्धापूर १, हिमायतनगर ४ तर मुदखेड तालुक्यातील ४ गावे नदीकाठी आहेत. प्रशासनाची पावसाळ्यात या सर्व १५६ गावांवर विशेष नजर असणार आहे. या सर्व १५६ गावांच्या परिसरात ४१ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत.
या आरोग्यकेंद्रांना नदीकाठच्या गावांची यादी देण्यात आली असून, या गावांना साथीबाबत जोखीमग्रस्त गावे समजून या गावांत साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना अग्रक्रमाने राबविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आले आहेत.
नदीकाठच्या गावांमध्ये साथीच्या आजारांची शक्यता गृहीत धरुन साथ उद्रेकाची सूचना मिळताच त्वरित पथकासह भेट देवून योग्य ती वैद्यकीय सेवा व साथ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, साथरोग नियंत्रणासाठी मागील तीन वर्षांत साथ उद्रेक उद्भवलेली गावे तसेच मोठ्या यात्रा भरणारी गावे या बाबी विचारात घेऊन जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे. या १४ गावांत उपाययोजना करण्याबाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. या भागात आरोग्यसेवा तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हास्तरावर २ व जिल्ह्यातून १६ अशी १८ वैद्यकीय पथकांची स्थापना केली आहे.
या गावांवर असणार आरोग्य विभागाचे विशेष लक्ष
- मागील तीन वर्र्षांत जलजन्य साथ उद्रेक उद्भवलेल्या गावांवर आरोग्य विभागाचे विशेष लक्ष असणार आहे. यात नायगाव तालुक्यातील कोलंबी, माहूर तालुक्यातील चोरड, मुखेड तालुक्यातील हिप्परगा, लोहा तालुक्यातील गौडगाव आणि माळेगाव अािण कंधारसह तालुक्यातील उमरातांडा या गावांत मागील तीन वर्षांत साथीचा उद्रेक झाला होता. त्यामुळे या गावांवर यंदा विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. याबरोबरच मोठी यात्रा भरणारी माहूर, माळेगाव, वडेपुरी, दाभड आणि शिकारघाट ही गावेही जोखमीग्रस्त गावांच्या यादीत टाकण्यात आली आहेत.
- जोखीमग्रस्त भागांत साथ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १५ दिवसांतून किमान एकदा गावभेट द्यायची असून प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषधीसाठा ठेवण्यात येत आहे.