पंतप्रधान नांदेडमार्गे चेन्नईला; नरेंद्र मोदींची विमानतळावरच अशोक चव्हाणांनी घेतली भेट
By शिवराज बिचेवार | Published: March 4, 2024 06:21 PM2024-03-04T18:21:21+5:302024-03-04T18:34:06+5:30
पोलिसांनी रविवारी रात्रीपासूनच विमानतळकडे जात असलेल्या रस्त्यावर बॅरीकेटींग केली होती.
नांदेड- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी सकाळी नागपूर येथून हेलिकॉप्टरने आदिलाबाद येथे गेले होते. आदिलाबाद येथून नांदेडला दुपारी दोन वाजेच्या सुमारास हेलिकॉप्टरने आल्यानंतर विशेष विमानाने ते चेन्नईला रवाना झाले. यावेळी विमानतळावर त्यांचे भाजपा खासदारांच्या वतीने स्वागत करण्यात आले. भाजपात प्रवेश केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची मोदींशी ही पहिलीच भेट ठरली.
पोलिसांनी रविवारी रात्रीपासून विमानतळाकडे जात असलेल्या रस्त्यावर बॅरीकेटींग करुन चोख बंदोबस्त ठेवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिलाबाद येथील सभेला संबोधित केल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार प्रतापराव चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार डॉ.अजित गोपछडे, आ.राम रातोळीकर, आ.तुषार राठोड, आ.राजेश पवार, आ.श्यामसुंदर शिंदे, आ.बालाजी कल्याणकर, विशेष पोलिस महानिरिक्षक शशीकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मोदींनी चव्हाणांचा हात हातात घेवून त्यांच्याशी संवादही साधला.
देशाचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांचे आज आदिलाबादहून नांदेडमार्गे चेन्नईला रवाना होण्यासाठी नांदेड विमानतळावर आगमन झाले असता त्यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने मला राज्यसभेची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. pic.twitter.com/bVO0n3Ixnb
— Ashok Chavan (@AshokChavan1958) March 4, 2024
बॅरीकेट लावून रस्ते अडविले
पोलिसांनी रविवारी रात्रीपासूनच विमानतळकडे जात असलेल्या रस्त्यावर बॅरीकेटींग केली होती. साेमवारी सकाळपासून राज कॉर्नर ते विमानतळ रस्त्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मुख्य रस्त्याला जोडणारे रस्ते बॅरीकेट लावून मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आले होते. फक्त दुचाकीस्वार आणि पादचार्यांनाच या मार्गाने जाण्याची मुभा होती. पावला-पावलावर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.