'राजकुमार पोचरस याने केशवेश्वर मंदिराला...'; येरगीत आढळला चालुक्यकालीन शिलालेख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 02:00 PM2023-02-17T14:00:03+5:302023-02-17T14:00:52+5:30
येरगी या गावाच्या पाठीमागील बाजूस पडझड झालेल्या स्थितीत एका मंदिराचे अवशेष काही वर्षांपासून पडून आहेत.
- शब्बीर शेख
देगलूर (जि. नांदेड) : तालुक्यातील येरगी येथे चालुक्यकालीन शिलालेख आढळला असून, या शिलालेखावर मंदिराला दान दिलेल्या साहित्याचा उल्लेख असल्याची माहिती पुरातत्त्व अभ्यासकांनी दिली.
येरगी या गावाच्या पाठीमागील बाजूस पडझड झालेल्या स्थितीत एका मंदिराचे अवशेष काही वर्षांपासून पडून आहेत. यात गर्भगृहाचे द्वार असून, अंतराळाचे दोन स्तंभ व सभामंडपाच्या चार स्तंभांवर मंदिर उभे आहे. येथील पुरातत्त्व अभ्यासक डॉ. कामाजी डक यांना हा शिलालेख आढळला. मंदिराच्या ललाटबिंबावर हा शिलालेख असून, तो लवकर नजरेत पडत नाही. द्वाराच्या ललाटबिंबावर गजलक्ष्मीचे शिल्प असून त्यावरील द्वारपट्टीवर हा शिलालेख पाच भागांमध्ये कोरला आहे. या द्वारास एकच स्तंभशाखा असून, त्याची उंची साधारणत: सहा फूट असून, रुंदी चार फूट आहे. बाजूला जालवातायन आहे. डॉ. कामाजी डक यांनी या शिलालेखाचे ठसे घेतले.
या हळ्ळेकन्नड शिलालेखाचे प्राथमिक वाचन कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथील प्रा. डॉ. बाळकृष्ण हेगडे यांनी केले. त्यानंतर अधिक सुस्पष्ट ठशांच्या साहाय्याने एच. जी. शशीधर यांनी शिलालेख वाचन पूर्ण केले. रविकुमार नवलगुंडा यांनीही थोडेसे विभिन्न वाचन उपलब्ध करून दिले. इतिहास संशोधक डॉ. नीरज साळुंखे यांनी संस्कृत व मराठी अर्थ स्पष्ट केला. या शिलालेखाचा काळ शोधण्याचा प्रयत्न केला असता, ११३८ मधील (चालुक्यकाळातील) हा शिलालेख असल्याचे संशोधक डॉ. नीरज साळुंखे यांनी सांगितले. येरगी हे चालुक्य काळातील अग्रहार होते. अग्रहार हे राजाने ब्राह्मणांना दिलेले करमुक्त गाव वतन असे. २३ जुलै ११२३च्या येरगी येथील शिलालेखात गोविंदरस याचा उल्लेख आला असून, त्याद्वारे या नव्या शिलालेखात त्याच्या मुलाचा उल्लेख असल्याने हा शिलालेख ११२३ नंतरचा आहे, हे नक्की. येरगी हे गाव होट्टलपासून दक्षिणेस तीन कि.मी. तर देगलूरपासून ११ कि.मी. अंतरावर असून, ऐतिहासिक व पुरातत्त्वीय दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
काय आहे या शिलालेखात...
द्वारपट्टीवर पाच भागांत असलेल्या या शिलालेखाची सुरुवात स्वस्ती श्रीमद गोविंदरस पत्नी अशी केली आहे. दुसऱ्या ओळीत भ (च) मिकब्बे (पोचरसाची/ बाचरसाची आई) असा उल्लेख आहे; तर तिसऱ्या ओळीत राजकुमार पोचरसाने (बाचरसाने) केशवेश्वर मंदिराला दान दिल्याचा उल्लेख आहे. रस म्हणजे राजा, राजपुरुष होय. चौथ्या ओळीत उपासनेचा उल्लेख आहे; तर पाचव्या ओळीत जाळांद्रव (जालांद्र) असा उल्लेख आहे. जाळांद्र म्हणजे कन्नडमध्ये जालवातायन म्हणजेच जाळीदार खिडकी होय. एकंदरीत गोविंदरस व भ(च)मिकब्बे यांचा पुत्र पोचरस याने केशवेश्वर (मितेश्वर) मंदिराला जाळीदार खिडकी व अन्य साहित्य दान दिल्याचा उल्लेख शिलालेखात आहे.