नांदेड जिल्ह्यात रस्ते, पाणी पुरवठा कामांना प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:09 AM2018-05-18T01:09:29+5:302018-05-18T01:09:29+5:30
आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून सन २०१७-१८ मध्ये विविध विकास कामावर कोट्यवधींचा निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी स्थानिक भागातील गरजा पाहून आपला निधी रस्ते आणि पाणी पुरवठ्यासाठी प्राधान्याने खर्च केल्याचे दिसते. मात्र त्याचवेळी आरोग्य आणि स्वच्छतेसारखा महत्वाचा विषय बाजुला राहिल्याचे निधी वाटपावरुन स्पष्ट होते. याबरोबरच शिक्षणाकडेही काहीसे दूर्लक्ष दिसते. काही मोजक्याच आमदारांनी शाळा, महाविद्यालयांना निधी दिला.
विशाल सोनटक्के।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून सन २०१७-१८ मध्ये विविध विकास कामावर कोट्यवधींचा निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी स्थानिक भागातील गरजा पाहून आपला निधी रस्ते आणि पाणी पुरवठ्यासाठी प्राधान्याने खर्च केल्याचे दिसते. मात्र त्याचवेळी आरोग्य आणि स्वच्छतेसारखा महत्वाचा विषय बाजुला राहिल्याचे निधी वाटपावरुन स्पष्ट होते. याबरोबरच शिक्षणाकडेही काहीसे दूर्लक्ष दिसते. काही मोजक्याच आमदारांनी शाळा, महाविद्यालयांना निधी दिला.
विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांसाठी आपल्या भागातील विकास कामांसाठी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी मिळतो. नांदेड जिल्ह्यात ९ विधानसभा सदस्य असून १ विधान परिषद सदस्य असल्याने १० आमदार स्थानिक भागातील नागरिकांच्या गरजा पाहून विकास कामे करतात. २०१७-१८ या वर्षातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीवर नजर टाकली असता बहुतांश आमदारांनी रस्ते बांधणी, दुरुस्ती आणि पाणीपुरवठा हे विषय प्राधान्याने हाती घेतल्याचे दिसते. १० आमदारांनी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमातून २६९ रस्ते कामासाठी निधी दिला आहे. यात सिमेंट रस्त्यांची संख्या सर्वाधिक आहे. रस्त्यापाठोपाठ पाणी पुरवठ्यावर निधी देण्यात आला असून १० आमदारांच्या माध्यमातून १७३ पाणीपुरवठा संबंधी कामांसाठी निधी दिल्याचे दिसून येते. ग्रंथालय आणि क्रीडा विभागाच्या विकास आणि संवर्धनासाठीही या आमदार फंडातून निधी देण्यात आला आहे. यातून काही ग्रंथालयांना ग्रंथ, रॅक व कपाटे उपलब्ध करुन दिली गेली. ग्रंथालयाप्रमाणेच क्रीडा विभागासाठीही निधी गेला आहे. या माध्यमातून काहींनी राज्यस्तरीय स्पर्धांसाठी तर काहींनी व्यायाम शाळेमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी दिल्याचे दिसते. याच निधीतून सभामंडप, गटारीची कामे, मोकळ्या जागेत पेव्हर ब्लॉक बसविणे, सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करणे, सुशोभिकरणासाठी निधी देण्याची कामे झाली आहेत. मात्र नागरिकांच्या दृष्टीने सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आरोग्य आणि स्वच्छता या विषयाकडे दूर्लक्ष झाल्याचे ही आकडेवारी सांगते. शिक्षणाच्या बाबतीतही अशीच परिस्थिती दिसून येते. आ. डी.पी. सावंत यांनी तीन शाळांना जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांमार्फत संगणक, प्रोजेक्टर उपलब्ध करुन देण्यासाठी निधी दिला आहे. आ. हेमंत पाटील यांनीही एका विद्यालयासह जिल्हा कारागृह, पोलि निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा सरकारी वकील कार्यालयास संगणक, प्रिंटर आदी साहित्य दिले आहे. आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा आणि कंधार तालुक्यातील ७ शाळांना संगणक, प्रिंटरसह इतर साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी निधी दिला आहे. त्याचप्रमाणे आ. सुभाष साबणे यांनीही देगलूर आणि बिलोली तालुक्यातील तीन शाळांना संगणकासह प्रोजेक्टर घेण्यासाठी आमदार फंडातून निधी दिला आहे. वरिल आमदार वगळता आ. अमिता चव्हाण, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ. प्रदीप नाईक, आ. अमरनाथ राजूरकर, आ. तुषार राठोड यांचा निधी शाळांसाठी गेलेला नाही.
हीच बाब आरोग्यासंबंधी जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी आरोग्य विषयक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासंबंधी पुढाकार घेतलेला नसल्याचे आकडेवारी सांगते.
स्वच्छ भारत अभियान ग्रामीण आणि शहरी भागात राबविले जात असले तरी या कामासाठीही आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून निधी गेलेला नाही. आ. डी.पी.सावंत, आ. हेमंत पाटील, आ. अमिता चव्हाण, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ. प्रदीप नाईक, आ. अमरनाथ राजूरकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. तुषार राठोड आदी सर्वच आमदारांचे याकडे दूर्लक्ष झाल्याचे दिसते. केवळ आ. प्रदीप नाईक यांनी माहूर नगरपालिका क्षेत्रामध्ये कचरा वाहून नेण्यासाठी या निधीतून गाडी घेण्यासाठी पैसा दिला आहे.
डी.पी. सावंत यांचा भर रस्ते कामावर
नांदेड उत्तरचे आ. डी.पी. सावंत यांनी सुमारे २१ रस्त्यांच्या कामासाठी आमदार फंडातून निधी दिला आहे. याच फंडातून पाणी पुरवठ्याची दोन कामे करण्यात आली असून एका ग्रंथालयाला तसेच क्रीडा विकासाच्या दोन कामासांसाठीही निधी दिला आहे. त्यांच्या निधीतून महानगरपालिका क्षेत्रात रस्ते कामाबरोबरच पाणी पुरवठ्याच्या सोयी उपलब्ध करुन दिले. सांस्कृतिक सभागृह उभारणे आदी कामे करण्यात आली आहेत. पाणी पुरवठ्याची एक काम त्यांच्या फंडातून झाले असून शिवाजीनगर पोलिस ठाणे कार्यालयात वॉटर प्युरिफायरही बसविण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे शिवाजीनगर पोलिस ठाण्याला संगणकही दिला असून इतर दोन शाळांना प्रोजेक्टर आणि संगणक देण्यात आला आहे.
४५ रस्ते कामांसाठी अमिता चव्हाण यांचा निधी
भोकर मतदार संघाचे आ. अमिता चव्हाण यांनी आमदार फंडातून भोकर आणि मुदखेड तालुक्यातील सुमारे ४५ रस्ते कामांसाठी निधी दिला आहे. आ. चव्हाण यांनी यावर्षी सर्वाधिक लक्ष्य रस्ता सुधारणेवर दिल्याचे दिसते. राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आणि हॉकी टुर्नामेंट हे राष्ट्रीय स्पर्धा सोडली तर उर्वरीत निधी रस्त्यासाठी वापरण्यात आला आहे. आ. चव्हाण यांनी भोकर आणि मुदखेड तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची कामे या फंडातून केली आहे. मात्र शिक्षण, आरोग्य, क्रीडा आदी सर्व विभागांना फंडातून निधी मिळालेला नाही. पाणी पुरवठ्याच्या कामासाठीही २०१७-१८ मध्ये निधी गेला नसल्याचे आकडेवाडीवरुन दिसून येते.
हेमंत पाटील यांचे सांस्कृतिक सभागृहासोबत रस्त्याकडे लक्ष
नांदेड दक्षिणचे आ. हेमंत पाटील यांनी रस्त्याच्या सुमारे २१ कामांसाठी निधी दिला आहे. पाणी पुरवठ्याचे एक कामासह तीन ग्रंथालयांसाठीही त्यांच्या फंडातून निधी गेला आहे. याबरोबरच नांदेड महानगरपालिकेअंतर्गत पाणी पुरवठा, व्यायामशाळा, सांस्कृतिक सभागृह आदीसाठी निधी देण्यात आला आहे. लोहा तालुक्यातील डेरला येथील सार्वजनिक वाचनालय आणि वाळकेवाडी येथील एका वाचनालयास त्यांचे आमदार फंडातून ग्रंथ खरेदीसाठी निधी देण्यात आला आहे. याबरोबरच लोहा तालुक्यातील मोहनपूर, मौजे दगडगाव येथे सांस्कृतिक सभागृह उभारणीसाठी निधी दिला आहे. आरोग्य विभागाला मात्र निधी गेलेला नाही.
प्रताप पाटील चिखलीकर यांचे पाणी पुरवठ्याला प्राधान्य
लोहा-कंधार मतदार संघाचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाणी पुरवठ्याची सर्वाधिक ६४ कामे केली आहेत. त्यांच्या आमदार फंडातून रस्ते विकासाच्या १५ कामांसाठी निधी गेला आहे. याबरोबरच कंधार तालुक्यात सौर पथदिव्याच्या दोन कामांसाठीही चिखलीकर यांनी निधी दिला असून ७ शाळांसाठीही संगणक, प्रिंटर पुरविले आहेत. कंधार आणि लोहा तालुक्यात विंधन विहिर खोदणे, विंधन विहिरीवर मोटारपंप बसविणे आदी कामे चिखलीकर यांनी प्राधान्याने केल्याचे दिसते. चिखली येथील पथदिव्यांची कामेही त्यांनी आपल्या फंडातून मार्गी लावली आहेत. याबरोबरच लोहा तालुक्यातील ६ तर कंधार तालुक्यातील एका शाळेला संगणकासाठी निधी दिला.
ग्रंथालयांना केले सहाय्य
देगलूर विधानसभा मतदार संघाचे आमदार सुभाष साबणे यांनीही रस्ते कामाला प्राधान्य दिल्याचे दिसते. त्यांनी तब्बल ४४ रस्त्यांच्या सुधारणेसाठी निधी दिला असून त्यांच्या आमदार फंडातून पाणी पुरवठ्याचीही १३ कामे झाली आहेत. ७ ग्रंथालयांना पुस्तक खरेदी सोबतच इतर साहित्य देण्यासाठीही त्यांनी निधी दिला आहे. पथदिवे बसविण्याची सर्वाधिक कामे झाली आहेत.
नायगावमध्ये वसंत चव्हाण रस्त्यांची ५३ कामे
नायगाव विधानसभा मतदार संघाचे आ. वसंत चव्हाण यांनीही इतर आमदारांप्रमाणेच रस्ते कामावर लक्ष्य केंद्रीत केल्याचे दिसते. त्यांच्या आमदार फंडातून रस्त्यांची ५३ कामे झाली आहेत. पाणी पुरवठ्याच्या ११ कामांसाठी त्यांनी निधी दिला असून क्रीडा विभागाच्या दोन तर एका ग्रंथालयालाही त्यांच्या आमदार फंडातून सहाय्य लाभले आहे. याबरोबरच एका शाळेला संगणक उपलब्ध करुन दिला आहे. याबरोबरच राज्यस्तरीय टेबल टेनिस आणि राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी त्यांच्या फंडातून निधी गेला आहे. तसेच दोन ग्रंथालये आणि एका शाळेसाठी साहित्य खरेदीसाठी त्यांच्या फंडातून निधीचे वितरण करण्यात आले आहे.
प्रदीप नाईक यांनी सर्वाधिक निधी दिला पाणी पुरवठ्याला
किनवट-माहूर मतदार संघाचे आ. प्रदीप नाईक यांनी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून पाणी पुरवठ्याची सर्वाधिक कामे केली असून तब्बल ६० पाणी पुरवठा योजनांसाठी त्यांच्या फंडातून निधी दिला आहे. विंधन विहिरी खोदणे, मोटार पंप बसविणे, पाईपलाईन करणे आदी कामे या निधीतून झाले आहेत. विशेषत: यातील बहुतांश कामे वाड्या-तांड्यावरती झालेली असल्याने तीव्र उन्हाळ्यात ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. याबरोबरच सभामंडप आणि सभागृह उभारणीसाठीही त्यांनी निधी दिला आहे. किनवट आणि माहूर तालुक्यातील प्रत्येक एका वाचनालयास साहित्य खरेदीसाठी निधी गेला आहे.
पंचायतींना सोलारपंप दिले
मुखेड-कंधारचे आ. तुषार राठोड यांनी पाणी पुरवठ्याची २० तर रस्त्याच्या १९ कामांसाठी निधी दिला आहे. याबरोबरच सोलार संच उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतीला निधी दिला असून सभामंडप आणि सांस्कृतिक सभागृहासाठीही त्यांच्या आमदार फंडातून निधी गेला आहे. शालेय साहित्य, क्रीडा विभाग यासाठी राठोड यांच्या फंडातून निधी गेला असल्याचे आकडेवारी पाहिल्यानंतर दिसून येते.
नागेश पाटील यांच्या फंडातून पाणी पुरवठ्याचे एकच काम
हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रस्त्याच्या सुमारे २१ कामासाठी निधी दिला आहे. तर पाणी पुरवठ्याचे अवघे एक काम त्यांच्या फंडातून झाले आहे. हिमायतनगर तालुक्यातील मंगरुळ येथे विहिरीचे खोदकाम करुन पाणी पुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. हदगाव, हिमायतनगर परिसरात रस्ते कामावर प्राधान्य दिले असले तरी आरोग्य, शिक्षण, क्रीडा आदी महत्वाच्या विभागाकडे निधीच गेलेला नाही. सांस्कृतिक सभागृह उभारणीसाठी नागेश पाटील आष्टीकर यांनी निधी वितरीत केला आहे. याबरोबरच होट्टल येथील सांस्कृतिक तथा पर्यटन महोत्सवाला पाच लाख दिले आहेत.
राजूरकर यांचा निधी सर्वच तालुक्यांना
विधान परिषद सदस्य असलेल्या आ. अमरनाथ राजूरकर यांनी सर्वाधिक निधी रस्ते कामांसाठी दिला आहे. त्यांच्या फंडातून ४९ रस्त्यांच्या सुधारणेची कामे होत आहेत. पाणी पुरवठ्याच्या एका योजनेसाठी त्यांनी निधी दिला असून दोन ग्रंथालये आणि क्रीडा विभागाच्या चार कामांनाही या फंडातून हातभार लाभला आहे. विधान परिषद सदस्य असल्याने नांदेड बरोबरच जिल्ह्यातील इतर तालुक्यांनाही या फंडातून विकास कामांसाठी पैसा गेला आहे. आ. राजूरकर यांचा निधी प्राधान्याने नांदेड, अर्धापूर, मुदखेड, नायगाव, बिलोली, मुखेड, धर्माबाद, लोहा, कंधार आदी तालुक्यात वितरीत झाला आहे. दोन शाळांना संगणकासाठीही सहाय्य झाले आहे.