खाजगी कोरोना रुग्णालये गाशा गुंडाळण्याच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 06:57 PM2020-10-15T18:57:49+5:302020-10-15T18:59:49+5:30
coronavirus news ही रूग्णालये बंद झाल्यावर खाजगी डॉक्टरांना शासकीय रूग्णालयात सेवा देण्याचा पर्याय जिल्हाधिकार्यांनी उपलब्ध करून दिला आहे. रूग्णसंख्या कमी होताच प्रशासनाला सूचना
- अनुराग पोवळे
नांदेड : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढ होत असताना कोरोना उपचारासाठी खाजगी रूग्णालयेही त्याच वेगाने निर्माण झाले होते. आता ही रूग्णालये गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असून याबाबत बुधवारी जिल्हाधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत खाजगी रूग्णालयांनी तसे संकेत दिले. खाजगी डॉक्टरांनी शासकीय रूग्णालयात सेवा द्यावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केल्या आहेत.
मार्चच्या दुसर्या आठवड्यापासून उद्भवलेल्या कोरोना संकटात नांदेड जिल्हा प्रारंभीच्या जवळपास एक ते दीड महिना हा ग्रीन झोनमध्ये राहिला. २२ एप्रिल रोजी जिल्ह्यात पहिल्या कोरोना रूग्णाची नोंद शहरातील पीरबुर्हाणनगर येथे झाली. त्यानंतर जुलैनंतर कोरोना रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत राहिली. ही परिस्थिती पाहून खाजगी रूग्णालयेही उपचारासाठी सरसावली होती. आजघडीला जिल्ह्यात १२ खाजगी रूग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहेत. कोरोनावरील उपचारासाठी या रूग्णालयांना महापालिकेची परवानगी आहे. मात्र आता रुग्णसंख्या घटत असल्याने या रुग्णालयांनी कोविड विभाग बंद करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
ही रूग्णालये बंद झाल्यावर खाजगी डॉक्टरांना शासकीय रूग्णालयात सेवा देण्याचा पर्याय जिल्हाधिकार्यांनी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा रूग्णालय, शासकीय रूग्णालय तसेच कोविड केअर सेंटरमध्येही या डॉक्टरांना गरजेनुसार सेवा बजावता येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात ७४ हजार ७९३ संशयीत रूग्णांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यात १७ हजार ६९८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर १५ हजार १५६ जणांनी कोरोनावर मात केली.
विविध रुग्णालयांत सध्या २७६ खाटा रिकाम्या
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही ८८ टक्यांवर पोहोचले आहे. रूग्णसंख्या वाढीच्या काळात रूग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी धावपळ करावी लागल्याचे चित्र होते. पण आज शासकीय रूग्णालयासह १२ खाजगी कोरोना रूग्णालयांत ९८ आयसीयु बेड रिकामे आहेत. साध्या बेडची उपलब्ध असलेली संख्या १७८ इतकी आहे. त्यामुळे आता खाजगी रूग्णालयांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कोरोना उपचार विभाग बंद करण्याबाबतचे संकेत दिले.