हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट उघड; नांदेडमधून खलिस्तान समर्थक दहशतवादी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 10:25 AM2021-02-09T10:25:40+5:302021-02-09T10:27:01+5:30
Pro-Khalistan terrorists arrested from Nanded खलिस्तान समर्थक इतर चार दहशतवादी यांच्यासह त्याने विदेशातुन निधी गोळा करणे, शस्त्र जमविणे यामध्ये तो सक्रिय होता.
नांदेड - खलिस्तान समर्थक दहशतवाद्यालानांदेड मधून अटक करण्यात आली आहे. सरबजीतसिंघ किरट असे दहशतवाद्याचे नाव असून हिंदूत्ववादी नेत्यांच्या हत्येचा त्याने कट रचला होता. नांदेड पोलिस आणि पंजाबच्या सीआयडी पथकाने ही कारवाई केली आहे. विमानाने त्याला मंगळवारी सकाळी अमृतसर येथे पाठविण्यात आले आहे.
सरबजीतसिंघ पंजाब मधील लुधियाना जिल्ह्यातील रहिवाशी आहे. खलिस्तान समर्थक इतर चार दहशतवादी यांच्यासह त्याने विदेशातुन निधी गोळा करणे, शस्त्र जमविणे यामध्ये तो सक्रिय होता. तसेच खलिस्तान चळवळीला विरोध करणाऱ्या हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट त्यांनी रचला होता. या प्रकरणात अमृतसर येथे गुन्हा नोंदवला होता. हा आरोपी पळून नांदेडमध्ये आला होता. पंजाब सीआयडी आणि स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी मध्यरात्री किरत याला अटक केली. किरत याला नांदेडमध्ये अटक झाल्याने खलिस्तान चळवळीचे नांदेड कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे.
नांदेडमध्ये शिकार घाट परिसरातून अटक केली आहे. तो खलिस्तान झिंदाबाद या संघटनेचा सदस्य आहे. या संघटनेला बेल्जियम येथून पैसा पुरवला जातो असे उघडकीस आले आहे.