धुर्वीय पक्षांच्या अन्न साखळीवर संशोधनासाठी प्रोफेसर चव्हाण अंटार्क्टिका मोहिमेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 07:34 PM2019-06-05T19:34:27+5:302019-06-05T19:37:45+5:30

‘अवकाश संशोधन’खालोखाल खडतर असते अंटार्क्टिका मोहिम

Professor Chavhan is on Antarctica campaign for research on birds' food chain and reproduction | धुर्वीय पक्षांच्या अन्न साखळीवर संशोधनासाठी प्रोफेसर चव्हाण अंटार्क्टिका मोहिमेवर

धुर्वीय पक्षांच्या अन्न साखळीवर संशोधनासाठी प्रोफेसर चव्हाण अंटार्क्टिका मोहिमेवर

Next
ठळक मुद्देभारताच्या ३९ व्या अंटार्क्टिका मोहिमेत नांदेड येथील प्रोफेसर चव्हाण यांचा समावेश  अति शीत वातावरणात धुर्वीय पक्षांचे प्रजनन व अन्न साखळीवर संशोधन

- भारत दाढेल 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील जैवशास्त्र संकुलातील प्राणीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रो. एस. पी. चव्हाण यांची भारताच्या ३९ व्या अंटार्क्टिका (दक्षिण ध्रुव) मोहिमेसाठी निवड झाली आहे. एनसीपीओआर (राष्ट्रीय ध्रुवीय व सामुद्रिक संशोधन संस्था, गोवा) येथून नोव्हेंबर  २०१९ मध्ये ही मोहीम निघणार आहे. या निमित्ताने त्यांची घेतलेली मुलाखत़ 


प्रश्न : अंटार्क्टिका मोहिमेसाठी निवड कशी झाली?
उत्तर : भारतातून प्रतिवर्षी दक्षिण ध्रुवावरील वातावरण, पर्यावरण, जैवसृष्टी, भूगर्भ विज्ञान, अवकाश विज्ञान इत्यादी विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांची निवड केली जाते़ जगातील काही प्रमुख देशांचे या ध्रुवावर संशोधन केंद्र आहेत. भारताच्या  मैत्री  आणि  भारती  या संशोधन केंद्रावर भारतीय शास्त्रज्ञ संशोधन करत असतात. या मोहिमेसाठी देशभरातील दहा ते बारा जणांची निवड होते़ सुरूवातीला या मोहिमेसाठी  एनसीपीओआर (राष्ट्रीय ध्रुवीय व सामुद्रिक संशोधन संस्था, गोवा हे जाहिरातीद्वारे प्रंबध मागवितात़ त्यानंतर देशभरातील विद्यापीठ व संशोधन केंद्रातील संशोधक त्यासाठी अर्ज करतात़ यामध्ये विविध विषय समाविष्ठ असतात़  संस्थेकडून प्राप्त प्रस्ताव तपासणीसाठी पाठविले जातात़ प्रस्ताव पात्र ठरल्यानंतर मुलाखती होतात़ मग त्यातून या मोहिमेसाठी निवड केली जाते़ या निवडीमुळे माझे स्वप्न अखेर पूर्ण झाले़ 

प्रश्न : ही मोहीम कशा पद्धतीने राबविण्यात येणार आहे?
उत्तर : या मोहिमेसाठी निवडल्या गेलेल्या यावर्षीच्या दहा शास्त्रज्ञांच्या टीममध्ये विविध राष्ट्रीय संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञ आहेत. त्यापैकी  मी महाराष्ट्रातील विद्यापीठातून एकमेव शास्त्रज्ञ आहेत.  ही मोहिम १५ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरू होणार आहे़ सुरूवातीला आमची वैद्यकीय तपासणी होईल़ त्यानंतर काही दिवस आम्हाला मिल्ट्री प्रशिक्षण देण्यात येईल़ अंटार्क्टिका येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत़ एक हवाई मार्ग  व दुसरा समुद्री मार्गे़ जहाजाने साधारणपणे  ५  ते ६ हजार कि़ मी़ अंतर कापत जावे लागते़ त्यामध्ये दोन ते अडीच हजार कि़ मी़ अंतरात समुद्रावर असलेला बर्फ कापत जावा लागतो़ यासाठी वापरण्यात येणारे जहाज हे नार्वेकडून घेण्यात येते़  या मोहिमेचे आयोजन आणि खर्च भारत सरकारचे पृथ्वी विज्ञान मंत्रालय करते. या मोहिमेसाठी साधारणपणे ५० ते ६० कोटी रूपये खर्च होतो़  अंटार्टिका खंड जगातील कुणालाही संशोधनासाठी उपलब्ध आहे.  या भागावर कोणाचाही मालकी हक्क नाही. सहा महिने दिवस व सहा महिने रात्र (हिवाळा) अशा वेगळ्या वातावरणात अतिशय खडतर पर्यावरणीय स्थितीत येथे चार महिन्यासाठी संशोधन चालते. अवकाश संशोधन मोहिमेखालोखाल अंटार्टिका मोहीम खडतर मोहीम मानली जाते.

प्रश्न : आपण कोणते संशोधन करणार आहात व त्याचे कोणते फायदे आहेत ?
उत्तर : जगातील गोड्यापाण्याच्या जवळपास ९०-९२ टक्के पाणीसाठा बर्फाच्या स्वरूपात दक्षिण ध्रुवावर आहे. तसेच हा भाग अनेक दुर्मिळ खनिजांनी व्यापलेला आहे. साधारणत: उणे नऊ अंश सेल्शियस ते उणे २५ अंश सेल्सियस अशा अति शीत वातावरणात  ध्रुवीय पक्ष्यांच्या प्रजनन व अन्नसाखळी तसेच पक्ष्यांचे अ‍ॅडाप्टेशन टू कोल्ड या विषयावर मी संशोधन करणार आहे़ अंटार्टिक खंडावर येथे ४५ जातीचे विविध पक्षी राहतात़ यामध्ये १८ जातीचे पेंग्वीन आढळतात़ इतर पक्ष्यामध्ये साऊथ पोलार्सकुवा हा पक्षीही सापडतो़ हा पक्षी कावळा, कबुतर, घार या सर्वांचे मिश्रन केल्यानंतर जो पक्षी तयार होईल, त्याप्रमाणे त्याची रचना आहे़ पेंग्वीन व्यतिरिक्त इतर पक्षी प्रजनन कसे करतात, अंडे कसे घालतात, एवढ्या थंडीत कसे राहतात, पक्ष्यांची संख्या कमी का होत आहे, ग्लोबल वार्मिंगचा काय परिणाम होत आहे, अशा सर्व बाजुने हे संशोधन करण्यात येणार आहे़ या संशोधनामुळे अंटार्क्टिकावर भारताचे अस्तित्व टिकवायचे आहे़ हे राष्ट्रीय काम आहे़ त्यामुळे या संशोधनाचे हक्क देशाकडे सुरक्षित असतात़ माझ्यासारख्या ग्रामीण भागातील प्रोफेसरची या मोहिमेसाठी निवड होणे हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासाठी सन्मानाचा मानला जात आहे़ 

लातूर जिल्ह्यात मूळ गाव
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात प्रा. शिवाजी प्रभाकर चव्हाण विभागप्रमुख आहेत. पण ते मूळचे इथले नाहीत. प्रा. चव्हाण यांचे मूळ गाव आहे लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद.चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण गावात झाले़  त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंत त्याचे शिक्षण कोकणात झाले़ कोकणातून परत लातूरला आल्यानंतर अहमदपूरमधील महात्मा गांधी महाविद्यालयात  पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यांनतर  पदव्युत्तर शिक्षण नांदेडमधील यशवंत महाविद्यालयात प्रा.चव्हाण यांनी पूर्ण केले. नंतर १९९३ ते २०११ पर्यंत परभणीतील ज्ञानोपासक महाविद्यालय आणि २०११ पासून स्वारातीम विद्यापीठात ज्ञानदानाचे काम करीत आहे.

Web Title: Professor Chavhan is on Antarctica campaign for research on birds' food chain and reproduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.