टाकावू वस्तूंपासून हळदीसाठी फायदेशीर यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:05 PM2018-10-22T12:05:59+5:302018-10-22T12:09:22+5:30
ग्रासरुटइनोव्हेटर : सुनील कौसल्ये यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा साहाय्याने शेती करून शेती ही नुकसानीची नव्हे, तर फायद्याचीच असल्याचे त्यांंनी दाखवून दिले.
- गोविंद शिंदे (बारूळ जि.नांदेड)
आजघडीला तरुण शेतकरीशेतीकडे वळत असल्याचे चित्र आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोगही केले जात आहेत. ज्यांनी यात यश मिळविले, असे आज आनंदी आहेत. राहाटी, ता. कंधार येथील सुनील कौसल्ये यांचा मूळ व्यवसाय शेतीचा. ते वेल्डिंग मेकॅनिकलचाही व्यवसाय करतात. कौसल्ये यांनी शेतीत वेगवेगळे उपक्रम राबविले. यंत्र बनविले. हळदीला माती लावण्यासाठी टाकावू वस्तूंपासून टिकाऊ यंत्र बनवून त्यांनी अफलातून यंत्र बनविले. त्यांचा हा उपक्रम परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरला आहे.
सुनील कौसल्ये यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा साहाय्याने शेती करून शेती ही नुकसानीची नव्हे, तर फायद्याचीच असल्याचे त्यांंनी दाखवून दिले. कौसल्ये हे दरवर्षी हळदीचे पीक घेतात. हळदीला दोन्ही सरीत माती लावण्यासाठी दरवर्षी एकरी ४ हजार रुपये मजुरी त्यांना द्यावी लागते. तीन एकरासाठी केवळ मजुरीवर त्यांना १२ हजार रुपये मोजावे लागत होते. एवढे करूनही मजूर मिळतील याची खात्री नाही. एकीकडे पैसे मोजा आणि दुसरीकडे मजुरांचे चोचले. यामुळे ते त्रस्त झाले होते. मजुराशिवाय काही करता येईल? हा विचार त्यांचा मनात घोळत होता.
कौसल्ये हे शेतकरी असले तरीही ते मेकॅनिकचा व्यवसायही करीत असल्याने त्यांनी दुकानातीलच भंगारातील जास्त जाडीचे पत्रे जमा करून त्याला त्रिकोणाचा आकार दिला. दोन पत्र्यांत एक फुटाचे अंतर ठेवले. एका पत्र्याची लांबी १६ इंची, तर रुंदी ४ इंची ठेवून समोर त्याला पाईप जोडून यंत्र तयार केले. यंत्र नागरासारखे झाले. यंत्राचा उपयोग केला. तो फायदेशीर ठरला. यामुळे वेळ, मनुष्यबळ, खर्चावर मात झाली. पिकांचे नुकसान टळले. कौसल्ये यांना १० एकर शेती आहे. भाऊ, वडील आदी सर्व जण त्यांना शेतीत मदत करतात. प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे