उद्घाटनानंतर सहा महिन्यांनी इलेक्ट्रीक ऑडिटसाठी प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:44 AM2021-01-13T04:44:18+5:302021-01-13T04:44:18+5:30
नांदेड : कोरोना संकटकाळात नव्याने उभारलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या शहरातील इमारतीच्या फायर ऑडिट आणि इलेक्ट्रीक ऑडिटचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ...
नांदेड : कोरोना संकटकाळात नव्याने उभारलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या शहरातील इमारतीच्या फायर ऑडिट आणि इलेक्ट्रीक ऑडिटचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. इमारतीचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून कोरोनाच्या काळात ही इमारत रुग्णांसाठी वापरण्यात आली. आता या इमारतीच्या फायर ऑडिटची प्रक्रिया पूर्ण झाली असून इलेक्ट्रीक ऑडिटचाही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
शहरातील गांधी पुतळा रस्त्यावर जिल्हा रुग्णालयाची नवी इमारत बांधण्यात आली आहे. जवळपास १५० खाटांचे हे सुसज्ज रुग्णालय सहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात या इमारतीच्या रुग्णांना उपचारासाठी मोठा दिलासा ठरला. त्यानंतर आता इतर प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहे. फायर ऑडिटचा प्रस्ताव मनपा अग्निशमन विभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार फायर ऑडिट पूर्ण झाले तर इलेक्ट्रिक ऑडिटचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला आहे पण त्याचवेळी दुर्घटना टाळण्यासाठी फायर एक्स्टींग्युशरची पुरेशी व्यवस्था रुग्णालयात करण्यात आली आहे.
लवकरच इलेक्ट्रीक ऑडीटही
जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. कोरोना संकटात रुग्णांना उपचाराची गरज पाहता तातडीने हे रुग्णालय सुरू करण्यात आले. रुग्णालय सुरू करताना सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली होती. फायर ऑडिट पूर्ण झाले असून आता इलेक्ट्रीक ऑडिटही केले जाणार आहे.
- डॉ. नीळकंठ भोसीकर
जिल्हा शल्य चिकीत्सक
रुग्णालयात सुविधांसह सुरक्षेचीही घेतली जाते काळजी
जिल्हा रुग्णालयाची सुसज्ज अशी इमारत आहे. या इमारतीत डॉक्टरांच्या उपचारांसह आवश्यक ती वैद्यकीय उपकरणेही उपलब्ध आहेत. वेळेवर उपचार दिले जातात. त्याचवेळी रुग्णालयातील सुरक्षेबाबत कोणतीही भीती नाही. या रुग्णालयाचा कोरोनाकाळात रुग्णांना मोठा लाभ झाला. सुरक्षेच्या अनुषंगाने कोणताही दुर्दैवी प्रकार घडला नाही.
- विशाल पाटील
नमस्कार चौक, नांदेड.
जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीत उपचार घेताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही भीती वाटली नाही. येथे सुरक्षा रक्षकांसह इतर दुर्घटना घडू नयेत, याचीही काळजी घेतली जाते. उपचारासाठीही डॉक्टर्स, परिचारिका आहेत. वेळेवर रुग्णांच्या आजाराचे निदान केले जाते. औषधेही रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- हुल्लपा अब्दागिरे
फायर एक्स्टींग्युशरची उपलब्धता
जिल्हा रुग्णालयाच्या सुसज्ज अशा १५० खाटांच्या रुग्णालयाची पाहणी केली असता अत्याधुनिक पद्धतीने बांधलेल्या या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात विद्युत व्यवस्था करण्यात आल्याचे चित्र दिसून आले. सुरक्षा रक्षकांची उपलब्धता होती. मुख्यत: फायर एक्स्टींग्युशर उपकरणे जागोजागी उपलब्ध असल्याचे दिसून आले.
इमारतीचे बांधकाम सहा महिन्यापूर्वी
जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. अजूनही सुरक्षा भिंतीसह इतर कामे केली जात आहेत. कोरोना संकटात रुग्णांसाठी तातडीने इमारत उपलब्ध करुन देण्यात आली. त्यामुळे इलेक्ट्रीक व फायर ऑडीटची प्रक्रिया थांबली होती.