आधार कार्डची सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:19 AM2021-01-03T04:19:01+5:302021-01-03T04:19:01+5:30
बोधडी : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बोधडी शाखेत आधार कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ...
बोधडी : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बोधडी शाखेत आधार कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
बोधडी व परिसरात आधार कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना २५ कि.मी. अंतरावरील किनवट येथे जावे लागते. यात दोन वेळेस चकरा माराव्या लागतात. तेव्हा कुठे आधार कार्डसाठी नंबर लागतो, असे नागरिकांनी सांगितले. यात वेळ आणि पैसा खर्ची होत असल्याने बोधडी येथे ग्रामीण बँकेत ही सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी विपीनकुमार यांच्याकडे केली आहे.
आठ उमेदवारांचे
अर्ज ठरले अवैध
लोकमत न्यूज नेटवर्क
बारड : छाननी प्रक्रियेत मुदखेड तालुक्यातील आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती नायब तहसीलदार संजय भोसीकर यांनी दिली.
तालुक्यातील ४५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ११०३ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ८ अवैध ठरले. ४५ ग्रामपंचायतींतर्गत १४५ प्रभाग असून ३७५ सदस्य संख्या आहे. मतदान प्रक्रिया तसेच निवडणूक कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तालुका महसूल प्रशासन कामाला लागले असून यात तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार संजय नागमवाड, शिवाजी जोगदंड, व्यंकटेश खानसोळे, गाजुलवार, मठपती आदी परिश्रम घेत आहेत.
१७२२ उमेदवारांनी भरली थकीत रक्कम
लोकमत न्यूज नेटवर्क
बिलोली : ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहण्यासाठी थकबाकी भरून बेबाकी प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. यात तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या १७२२ उमेदवारांनी लाखो रुपयांची थकबाकी भरून उमेदवारी अर्ज भरला.
थकबाकी भरल्याने संबंधित ग्रामपंचायतींना मोठा महसूल मिळाला आहे. निवडणुकीनिमित्त ग्रामपंचायतींना थकीत रक्कम वसूल करण्यास मोठा हातभार लागला. मधल्या काळात कोरोनामुळे विविध ग्रामपंचायतींची वसुली ठप्प झाली होती. थकबाकीची रक्कम लाखोंच्या घरात होती. यातच ग्रामपंचायत निवडणुका लागल्याने थकीत रक्कम मोठ्या प्रमाणात वसूल झाली. त्यामुळे ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या.
फोटो कॅप्शन
कासराळी येथील प्रभाग क्रमांक पाचमधील बौद्ध वस्तीत गेल्या चार वर्षांपासून नादुरुस्त असलेले हातपंप तब्बल चार वर्षांनंतर दुरुस्त झाले आहेत.
दत्त सप्ताहाची लोह्यात सांगता
लोहा : लोह्यातील श्रीदत्त सप्ताहाची नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, गोदावरीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते आरती करून सांगता करण्यात आली. यावेळी समितीचे प्रकाश बोडलवाड, अभिजीत रहाटकर, श्राकांत मोरे, किशन पवार, राहुल बिडवई, पांडुरंग रहाटकर यांच्यासह भक्त उपस्थित होते.