प्रक्षोभक भाषण भोवणार; नांदेड हिंसाचार प्रकरणी व्यासपीठावरील सर्वपक्षीय नेते रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 01:03 PM2021-11-17T13:03:00+5:302021-11-17T13:03:22+5:30
नांदेड आणि अमरावती येथे झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
नांदेड- त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ रझा अकादमीच्या वतीने १२ नोव्हेंबर रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंददरम्यान दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. हिंसाचारापूर्वी झालेल्या सभेत व्यासपीठावर अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यांनी प्रक्षोभक भाषणे केली आहेत. त्यामुळे तेही आमच्या दृष्टीने आरोपीच आहेत, असे अपर पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी स्पष्ट केले.
नांदेड आणि अमरावती येथे झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानंतर अपर पोलीस महासंचालक संजय कुमार हे नांदेडात आले होते. ते म्हणाले, शुक्रवारच्या हिंसाचारातील ८३ आरोपींची आतापर्यंत ओळख पटली आहे. त्यातील ५० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील दहा जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. त्यांचा जामीन कसा रद्द करता येईल, या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येत आहेत. आयोजक रझा अकादमीच्या व्यासपीठावर अनेक पक्षांचे नेते होते. या नेत्यांनी या ठिकाणी भाषणेही केली. यातील प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत.
आरोपींच्या अटकेसाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून, लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, विजय कबाडे, उपाधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे, चंद्रसेन देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची उपस्थिती होती.
प्रक्षोभक वक्तव्ये करणारे भूमिगत
धरणे आंदोलनादरम्यान व्यासपीठावर इतर राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. या नेत्यांनी त्यावेळी प्रक्षोभक भाषणे केली; परंतु पोलिसांनी धरपकड सुरू केल्यानंतर हे नेते आता भूमिगत झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी दहा पथके तयार केली आहेत.