विधानसभेत विजयाची आस, पंजाबच्या अकाली दलाचे उमेदवार दर्शनासाठी नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 14:30 IST2022-03-04T14:28:49+5:302022-03-04T14:30:51+5:30
Punjab Assembly Election 2022: १० मार्च रोजी पंजाबसह देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार

विधानसभेत विजयाची आस, पंजाबच्या अकाली दलाचे उमेदवार दर्शनासाठी नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात
नांदेड : पंजाबसह देशातील (Punjab Assembly Election 2022)पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे. निवडणुकीनंतर पंजाबमधील फत्तेगड साहिब सरहिंद आणि हरगोबिंदपूर घुमान विधानसभा मतदार संघातील अकाली दलाचे उमेदवार सरदार जगदीप सिंघ चिमा आणि सरदार राजनबीर सिंघ घुमान हे गुरुद्वारा दर्शनासाठी नांदेड येथे दाखल झाले आहेत. यासह त्यांनी नरसी नामदेव येथेही दर्शन घेतले.
जनतेचा आशीर्वाद मतपेटीतून व्यक्त झालेलाच आहे. आता गुरू महाराजांचीही आपल्यावर कृपा व्हावी, यासाठी प्रार्थना करण्यासाठी ही राजकीय मंडळी श्री सचखंड गुरुद्वारा येथे नतमस्तक होताना दिसत आहेत. पंजाबमध्ये राजकारणाबरोबर समाजकारण आणि धार्मिक श्रद्धेला तितकेच महत्व दिले जाते. ‘गुरु’जीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वच जण नतमस्तक होतात. त्याचाच एक भाग म्हणून ही मंडळी हुजूर साहिब तख्तचे दर्शन घेण्यासाठी नांदेडमध्ये दाखल झाली आहेत.
सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री सरदार प्रकाशसिंघ बादल हेसुद्धा नांदेडला दर्शन करून नतमस्तक झाले होते. १० मार्च रोजी पंजाबसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पंजाबमधील सर्वच पक्षांचे उमेदवार गुरु साहिब यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पाच तख्तांचे दर्शन करत आहेत. काँग्रेसचे उमेदवारही तख्त दर्शनासाठी आले आहेत.फत्तेगड साहिब सरहिंद विधानसभा मतदार संघातील अकाली दलाचे उमेदवार सरदार जगदीप सिंघ चिमा हे सचखंड गुरुद्वारामध्ये नतमस्तक होऊन बुधवारी चंदीगडला रवाना झाले. नांदेडमध्ये नानक साई फाऊंडेशनच्या वतीने पंढरीनाथ बोकारे यांनी त्यांचे स्वागत केले.