अठरा दिवसात १३ हजार ५२० क्विंटल कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:31 AM2020-12-14T04:31:46+5:302020-12-14T04:31:46+5:30
एन एच ४४ आखूड धाग्याचा कापूस या सदराखाली सीसीआयने ५ हजार ७२५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात ...
एन एच ४४ आखूड धाग्याचा कापूस या सदराखाली सीसीआयने ५ हजार ७२५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. २१ नोव्हेंबरला खरेदीचा शुभारंभ झाला सुट्टीचे दिवस वगळता आजपर्यंत १८ दिवस कापूस खरेदी झाली आहे. कापसाचे उत्पन्न खूपच घटले आहे. अशाही परिस्थितीत सात हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. एसएमएसच्या तुलनेत शेतकरी आपला उत्पादित कापूस आणत नसल्याचे दिसून येत आहे.
९३४ शेतकऱ्यांना एसएमएस पाठवण्यात आले त्यापैकी ४८३ शेतकऱ्यांनी १३ हजार ५२० क्विंटल ६० किलो कापूस अठरा दिवसांत सीसीआयच्या खरेदी केंद्रावर विकला आहे. पाठवलेले एसएमएस व खरेदी केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांचा कापूस पहाता पन्नास टक्के शेतकऱ्यांनी आपला उत्पादित कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकून मोकळे झाले म्हटल्यास वावगे ठरू नये.
आजही काही खासगी व्यापारी शेतकऱ्यांचा सातबारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक मिळवून त्यांच्या नांवाने कापूस टाकत असल्याचे बोलले जात आहे.
खासगी व्यापाऱ्यांचा कापूस खरेदी केंद्रावर येण्याची शक्यता पहाता शेतकऱ्यांनी कुण्याही खासगी व्यापाऱ्यांना आधारकार्ड, सातबारा, बँकेचे पासबुक देऊ नये असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रवि तिरमनवार यांनी यापूर्वीच केले आहे. जर शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना सातबारा व इतर कागदपत्रे दिल्यास येत्या काळात शासनाच्या सबसिडी व इतर योजनांना मुकावे लागेल असा इशाराही दिला होता.
बऱ्याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात कापूसच नसल्याने एसएमएस येऊनही कापूस नेत नसल्याचे चित्र आहे. २०२० च्या पावसाळ्यात पाऊस दिवस जास्त असल्याने व परतीच्या पावसानेही कहर केल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला आहे नव्हे कापूस, सोयाबीन व इतर खरीप हंगामातील पीक निसर्गाच्या लहरी प्रकोपाने गिळले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.