थकीत मानधनासाठी सीएचबी प्राध्यापक आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:23 AM2019-06-07T00:23:22+5:302019-06-07T00:24:14+5:30
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालयात अनुदानित घड्याळी तासिकेवर काम करणा-या प्राध्यापकांचे मानधन उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत गत सहा महिन्यापासून रोखल आहे़
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालयात अनुदानित घड्याळी तासिकेवर काम करणा-या प्राध्यापकांचे मानधन उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत गत सहा महिन्यापासून रोखल आहे़ अनेक वेळा निवेदन देऊनही मानधन मिळत नसल्याने सीएचबी प्राध्यापकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे़ यासंदर्भात गुरूवारी सहसंचालकांना निवेदन दिले आहे़
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यातील हजारो प्राध्यापक घड्याळी तासिकेवर मानधनावर काम करतात़ सदरील प्राध्यापकांचे आॅक्टोबर २०१८ पासून मानधन रखडले आहे़ शासनाने १४ नोव्हेंबर रोजी अध्यादेश काढून घड्याळी तासिकेवर काम करणाºया प्राध्यापकांच्या मानधनात वाढ केली़ सर्व महाविद्यालयाने सहा महिन्यापूर्वीच सीएचबी प्राध्यापकांचे वाढीव देयके उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सादर केले़ परंतु सहसंचालक कार्यालयाने मात्र आमच्याकडे निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून मानधन देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे़ एकीकडे तासिका तत्वावर काम करणाºया प्राध्यापकांकडे पूर्ण पात्रता आहे़ परंतु अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते़ महाविद्यालयातील परीक्षा असो किंवा अन्य इतर सर्व कामे सीएचबी प्राध्यापकांना नाईलाजास्तव करावे लागतात़ वर्षातून केवळ दोन वेळेस या प्राध्यापकांना मानधन मिळते़ वर्षभर त्यांना हलाखीचे जीवन जगत संघर्ष करावा लागत आहे़ सहा महिन्यापासून रखडलेले मानधन येत्या पंधरा दिवसात न मिळाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे़ निवेदनावर प्रा़ डॉ़ एस़ आऱ रगडे, प्रा़ आऱ जी़ कुंटूरकर, प्रा़ धुळे, प्रा़ गिरी, प्रा़ व्ही़ डी़ जाधव, प्रा़ बीचेवार, प्रा़ मारोती देशमुख, प्रा़ स्वामी, प्रा़ बी़ आऱ नरवाडे आदींच्या स्वाक्ष-या आहेत़
अनेक महाविद्यालयात मानधनाला कात्री
तासिका तत्वावरील काम करणा-या प्राध्यापकांना एक तर महाविद्यालयात शिकवणी करीत असताना सात तासिकेचा आदेश असतो़ परंतु त्यांना मात्र आठ किंवा नऊ तासिकेचा कार्यभार घ्यावा लागतो़ उर्वरित एक किंवा दोन तासिकेचे मानधन मिळत नाही़ तर दुसरीकडे अनेक महाविद्यालयात मात्र आलेल्या एका एका प्राध्यापकांच्या मानधनातून पाच ते सहा हजार रूपयांची कपात केली जाते़ हा प्रकार म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार तासिका तत्वारील प्राध्यापकांना सहन करावा लागत आहे़